मुंबई- अॅण्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख असलेले कनिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सेठ यांनी काल रात्री 11 वाजताच्या दरम्यान संजय पांडे यांच्याकडून महासंचालकाचा पदभार स्वीकारला. नियुक्तीचे आदेश जारी झाल्यानंतर सेठ यांनी मुख्यालयात जाऊन संजय पांडे यांच्याकडून महासंचालक पदाचा कार्यभार स्कीकारला.
1998 बॅचचे अधिकारी -
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली. ते 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आले होते. मात्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सरकारला फटकारले होते. सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. विद्यमान पोलिस महासंचालक पांडे यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी होती. संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल 2021 पासून त्यांच्यावर महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र पांडे यांना या पदावरून हटविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे ॲड. दत्ता माने यांनी केली होती.