मुंबई IOC Session Mumbai 2023 : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची 141 वी बैठक (International Olympic Committee Meeting) मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जिओ कन्वेंशन सेंटरमध्ये येत्या 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे. सुमारे 40 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक देशात होत आहे. यापूर्वी 1983 मध्ये दिल्लीत ही बैठक झाली होती. या बैठकीमुळे भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक नकाशावर स्वतःला स्थापित करणं शक्य होणार आहे. तसंच भारतासाठी क्रीडा क्षेत्रातील हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरणार असल्याचं क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितलं.
पंतप्रधानांची बैठकीला उपस्थिती : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी सदस्य आणि देशाच्या प्रतिनिधी नीता अंबानी उपस्थित असणार आहेत. कार्यकारी मंडळासोबत ही बैठक 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं सत्र घेतलं जाणार आहे. या सत्राचा उद्घाटन समारंभ 14 ऑक्टोबरला पार पडणार आहे. यावेळी ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक उपस्थित राहणार आहेत.
सहाशेजण राहणार उपस्थित: हा या सत्रामध्ये ऑलिंपिक खेळांच्या यजमानाची निवड करणं, ऑलिंपिक समितीचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची निवड करणं, ऑलिंपिक सनद ठरविणं तसंच त्यात सुधारणा करणं, ऑलिंपिक कार्यक्रमात खेळ प्रकारांचा समावेश करणं अथवा वगळणं याबाबतीत चर्चा होणार आहे. या बैठकीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे 600 आंतरराष्ट्रीय आणि देशातील शंभर प्रमुख खेळ प्रकारातील सहाशे व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं.