मुंबई :मुंबईतील महानगरपालिकेच्या गरीब कामगारांना कोविड काळात खिचडी वाटप करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. यासाठी मुंबई महानगरपालिकेने 50 कंत्राटदार नेमून 160 कोटी रुपयांच्या खिचडीचे वाटप केल्याचे दाखवले आहे. पाच कोटी पॅकेट्स कामगारांना वाटल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र या खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केला.
बारा कंत्राटदार बोगस :खिचडी वाटपाचे कंत्राट पन्नास कंत्राटदारांना महानगरपालिकेतर्फे देण्यात आले होते. 12 पेक्षा अधिक कंत्राटदार बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खिचडी वाटपामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही समावेश असल्याचा दावा किरीट सोमैया यांनी केला आहे. 50 कंत्राटदारांना 132 कोटी 89 लाख रुपये वितरित केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. यापैकी राजीव साळुंखे या केईएम रुग्णालयासमोर रिफ्रेशमेंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये दहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सह्याद्री रिफ्रेशमेंट या नावाने वैश्य सहकारी बँकेत हे खाते असून या खात्यामध्ये खिचडी वाटपाचे पैसे वर्ग करण्यात आले असे सोमैयां यांनी म्हटले आहे.