मुंबई :नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यात आली आहे. या मंदिराचे भूमीपूजन 7 जून रोजी होणार आहे. TTD ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'भूमिपूजन' समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील पहिले TTD मंदिर असणार आहे.
पर्यटन वाढणार :या मंदिराची उभारणी झाल्यास भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. दरम्यान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी शहर पातळीवरील सुविधा म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत जमीन देण्यात आली आहे. उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 येथे हे उभारले जाणार आहे.
इतका येणार खर्च :जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर ट्रस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाणार आहे. साधरण 10 एकर जागेवर हे मंदिर उभारले जाणार आहे. दरम्यान एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्राने TTD ला जमिनीचे वाटप केले होते. हा भूखंड होऊ घातलेल्या विमानतळाजवळ आहे. या जमिनीची किमत 500 कोटी इतकी आहे, मंदिर उभारणीसाठी अंदाजे 70 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
देशात अनेक ठिकाणी उभारले श्री व्यंकटेश्वराचे मंदिर: तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदिरे उभारण्यात आली आहेत. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.
हेही वाचा -
- Bandra Versova Sea Link : वर्सोवा-वांद्रे सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणार; शौर्य पुरस्कारही देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mumbai Trans Harbor Link : शिंदे, फडणवीसांनी केली मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी