मुंबई - भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीमागे राजकारण सुरू असल्याचे खडसे यांनी गुरुवारी बोलून दाखवले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही खडसेंच्या मताला दुजोरा दिला. देशासह राज्यातील सत्ताधारी पक्ष सर्रास तपास यंत्रणांचा करतात. खडसेंनीही भाजप सोडल्यानंतर चौकशी सुरू झाली असून ती कुठपर्यंत चालेल, याबाबतही साशंकता वाटते, असे मत ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे -
पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणाच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. तर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. खडसे यांचीही गुरुवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ईडीमार्फत चौकशी सुरू होती. त्यापूर्वी एमआयडीसीच्या जागेबाबत कोणताही गैरव्यवहार झाला नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. जमीन गैरव्यवहाराची संपूर्ण माहिती ईडीला पुराव्यानिशी दिल्याचे त्या म्हणाल्या. तसेच भ्रष्टाचारा विरुद्ध लढताना सगळ्यांनी एकत्र येऊन ईडीवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोषींना शिक्षा मिळेल. खडसेही दोषी असतील तर त्यांनाही शिक्षा व्हायला हवी, असे दमानिया म्हणाल्या.
सत्ताधाऱ्यांकडून तपास यंत्रणांचा वापर -
देशासह राज्यात सत्ता असलेल्या राजकीय पक्षांकडून हाती असलेल्या तपास यंत्रणांचा नेहमीच वापर करतात. राज्यात पोलीस आणि एसीबी, तर केंद्राकडून ईडी, सीबीआय आणि एनआयए चौकशीचा ससेमिरा लावला जातो. आताही खडसे भाजपमधून बाहेर पडल्यानंतर ईडीची चौकशी सुरू आहे. ती कुठपर्यंत चालेल, काय होईल याबाबत संशयही दमानिया यांनी व्यक्त केला.