मुंबई- माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लिहलेल्या पुस्तकाने खळबळ उडाली आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याची नव्याने चौकशी करा, अशी मागणी भाजपने केली आहे. मारिया यांनी लिहलेल्या 'लेट मी से इट नाऊ' पुस्तकात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला हिंदू दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा केला आहे.
या पुस्तकाच्या आधारेच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
मुंबईत 11 वर्षापूर्वी झालेल्या 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी कसाबला पाकिस्तानी आयएसआय संघटनेने हिंदू दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा आता तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी केला आहे. याच काळात काही विशिष्ठ विचारसरणीच्या लोकांनी आणि काँग्रेस नेत्यांनीही हा हिंदुत्ववादी हल्ला असल्याचे बिनबुडाचे आरोप ही केले होते, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, असे भातखळकर यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच या हल्ल्याची चौकशी राम प्रधान यांनी केली होती. मात्र, तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकराने या प्रधान आयोगाचा अंतिम अहवालही उघड केला नाही. त्याचबरोबर या हल्ल्यातील दहशतवाद्यांना काही स्थानिकांनी मदत केल्याचे बोलले जात आहे. त्या मदतीचे आणि मदत करणाऱ्यांचा उल्लेख ही करू नये, असे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी प्रधान यांना सांगितले होते, याबाबत ही खुलासा व्हावा अशी मागणी भातखळकर यांनी पत्रात केली आहे. राष्ट्रसुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अतिशय गंभीर असताना या हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या सुरात-सूर मिळवणाऱ्या लोकांची चौकशी होणे गरजेचे आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.