मुंबई -लोकसभा निवडणुकीसाठी देशात आणि राज्यात उमेदवारांच्या संपत्तीचा आणि त्यांच्या शिक्षणाचा विषय गाजत असतानाच मुंबईत उत्तर लोकसभा मतदारसंघात चक्क पहिली उत्तीर्ण झालेल्या एक उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे. विलास हिवाळे असे या उमेदवाराचे नाव आहे. मार्कसिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (रेड फ्लॅग) या पक्षाकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तसे ते मुंबईत या पक्षाकडून उभे असलेले एकमेव उमेदवार आहेत.
.पहिली शिकलेल्या उत्तर मुंबईतील 'त्या' उमेदवाराला लोकसभेसाठी काय वाटते? दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिलेल्या शपथपत्रात आपल्याकडे केवळ 1 हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या अनामत रकमेसाठी त्यांना या विभागातील कामगारांनी एक-एक रुपया जमा करून दिल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
घरच्या परिस्थितीमुळे आपले शिक्षण पहिलीपर्यंत झाले असले तरी लोकशिक्षण आणि कामगार, शेतकरी यांच्या समस्यातून आपण समाज शिक्षण घेतले असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकरे लोकसभेत शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सुटत नसल्याने माझ्यासारखा त्यांचा उमेदवार गेला पाहिजे असेही ते म्हणाले. मुंबईत आणि माझ्या मतदार संघात घरांचा, झोपडपट्टी आणि त्यांच्या पुनर्विकास यांचा मोठा प्रश्न आहे. तो सत्ताधारी पक्ष सोडवत नाहीत, यामुळे नवीन बदल व्हावा, म्हणून मी मैदानात असल्याचे ते म्हणाले. आज देशात शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असून सर्वच वर्गातील गोरगरीबांना शिक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने सुटावेत असे आपल्याला वाटते असेही हिवाळे म्हणाले.
आपल्याला अजून निवडणूक चिन्ह मिळाले नसले तरी दिवसभर बांधकाम करून मी आणि माझे इतर सर्व सहकारी सायंकाळी -सकाळी वस्त्या-वस्त्यांमध्ये प्रचाराला जात आहे. मी स्वतःच बांधकाम, नाका कामगार यांचा एक प्रतिनिधी म्हणून कामगार चळवळ चालवत आहे. त्यांच्या प्रश्नासाठी माझ्यासारखा प्रतिनिधी संसदेत गेला पाहिजे म्हणून मी उभा असल्याचे ते म्हणाले. माझ्यासमोर अनेक मोठे पैसेवाले लोक उभे असले तरी मी मात्र माझ्या कष्टकरी, कामगार, उपेक्षित घटकांकडे जाऊन प्रचार करणार असल्याचेही ते म्हणाले.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राज्यातील शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षणाचा आणि पदवीचा मुद्दा मागील काही वर्षात गाजत आहे. तशातच मुंबईच्या उत्तर लोकसभा मतदारसंघातून पहिलीचे शिक्षण पूर्ण केलेल्या हिवाळे यांनी मैदानात उडी मारली आहे. यामुळे येत्या काही दिवसात त्यांच्या शिक्षणाचा विषय चर्चेत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.