मुंबई -महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयात 500 हून अधिक इंटर्न डॉक्टर कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. मात्र, त्यांना इतर डॉक्टरांप्रमाणे 9 दिवस काम 6 दिवस सुट्टी अशी सुविधा नाही. केईएम रुग्णालयाने कोरोना पॉझिटिव्ह इंटर्न डॉक्टरांची क्वारंटाइन काळातील सुट्टीची नोंद गैरहजर म्हणून दाखवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय विरोधानंतर मागे घेण्यात आला आहे. पण, इंटर्न डॉक्टरांना मिळणाऱ्या या वागणुकीमुळे ते आता खूपच आक्रमक झाले आहेत. आम्हालाही 9 दिवस काम आणि 6 दिवस सुट्टी लागू करावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न अर्थात आस्मिने उचलून धरली आहे.
नायर, कूपर, सायन, केईएम, अशा रुग्णालयात सध्या 500 हून इंटर्न डॉक्टर निवासी डॉक्टरांच्या बरोबरीने कोरोनाशी लढत आहेत. मात्र, निवासी डॉक्टरांना ज्याप्रमाणे 9 दिवस काम 6 दिवस सुट्टी मिळते, अशी सुविधा त्यांना मिळत नाही. एखादा इंटर्न डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरच त्याला क्वारंटाइनसाठी सुट्टी मिळते. अन्यथा 7 दिवस काम 1 दिवस सुट्टी वा 3 दिवस काम 1 दिवस सुट्टी, अशी सुविधा त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे या डॉक्टरांना लक्षणे आढळल्यानंतर किंवा पॉझिटिव्ह आल्यानंतरच क्वारंटाइन केले जाते. तोपर्यंत त्यांच्या संपर्कातील इतरांनाही संसर्ग होतो. त्यामुळे कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या इंटर्न डॉक्टरांनाही क्वारंटाइन होत स्वतःलाही कोरोनापासून दूर ठेवण्याची सुविधा मिळायला हवी, अशी भूमिका असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न अर्थात आस्मिने घेतली आहे. पण, ही मागणी मान्य होत नसल्याने सध्या तरी आहे तशा परिस्थितीत इंटर्न काम करत आहेत. मात्र, त्यामुळे अनेक इंटर्न कोरोनाबाधित होत आहेत. केईएममध्येच आठ इंटर्न डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.