मुंबई - मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेड्स कमी पडत आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने लक्षणे असलेल्या रुग्णांवर रुग्णालयात तर लक्षणे नसलेल्या व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर हॉटेलमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने इंटरकॉन्टिनेंटल, ट्रायडंट हे दोन हॉटेल ताब्यात घेतले आहेत. या हॉटेलमध्ये बॉम्बे हॉस्पिटल तसेच एच एन रिलायन्स रुग्णालयाकडून उपचार केले जाणार आहेत. तसेच इतर ठिकाणीही बेड्स वाढवले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.
पंचतारांकीत हॉटेल ताब्यात -
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून पुन्हा रूग्णांचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्सची कमतरता जाणवत असल्याने ज्या रूग्णांवर रुग्णालयात उपचार करण्याची आवश्यकता नाही, अशा रूग्णांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तर, ज्यांना लक्षणे आहेत, ऑक्सिजन, आयसीयू तसेच व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे अशांना रूग्णालयात उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने मरिन ड्राईव्ह येथील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल व बिकेसी येथील ट्रायडंट हॉटेल ताब्यात घेतले आहे.