मुंबई- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत आता राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. ही सेवा उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे, आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही, अशी माहिती आज पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
लालपरी सुरू झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.
बस सेवा सुरू होणार असल्याने गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती परब यांनी दिली. ते पुढे म्हणाले, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरू होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे परब म्हणाले.
२३ मार्चपासून कोरोना महामारीमुळे मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविणे, कोल्हापूर-सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. २२ मे पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १ हजार ३०० बसेसमधून सरासरी ७ हजार २८७ फेऱ्यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा एसटीने पुरविली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड-१९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले आहे.