मुंबई- लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर आजपासून (20 ऑगस्ट) महाराष्ट्राची लालपरी रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. राज्य परिवहन विभागाच्यावतीने एसटी बसच्या आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. आज सकाळपासून विविध जिल्ह्यातून आंतरजिल्हा वाहतूकीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, गोंदिया, औरंगाबाद जिल्ह्यातही आंतरजिल्हा वाहतूकीला सुरुवात झाली आहे.
5 महिन्यानंतर रत्नागिरी आगारातून कोल्हापूर, मिरज आणि सांगलीसाठी सुटल्या एसटी बसेस
रत्नागिरी-कोरोनामुळे मार्चपासून बंद ठेवण्यात आलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक अखेर आजपासून सुरू झाली आहे. रत्नागिरी आगारातूनही कोल्हापूर, मिरज आणि सांगलीसाठी आज एसटी बसेस सुटल्या. तब्बल 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु झाली. तब्बल सहा एसटी बसेस आज रत्नागिरी आगारातून इतर जिल्ह्यात गेल्या. एसटी प्रवासाकरिता ई पासची आवश्यकता नसल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची सेवा 23 मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती.
22 मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली होती. दरम्यान, मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटी धावून आली होती. गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी होत होती, त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
रत्नागिरी आगारातून गुरुवारपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली. पहाटे 5 च्या सुमारास पहिली फेरी कोल्हापूर मार्गावर सुटली. कोल्हापूरसाठी एकूण 4 गाड्या, तर मिरज आणि सांगलीसाठी प्रत्येकी एक गाडी सुटल्याची माहिती एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली, त्यात ई-पासची आवश्यकता नाही, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
आजपासून गोंदियातून आंतरजिल्हा बससेवा सुरू
गोंदिया- आंतरजिल्हा बस फे-यांपुरती लावण्यात आलेली लालपरीची बंधने आता तुटली आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाने आता राज्य परिवहन महामंडळाला आंतरराज्य फे-यांची परवानगी देण्यात आली. गोंदिया आगाराने ७ आंतरजिल्हा फे-यांचे नियोजन केले होते. संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर वाढलेला असताना देखील प्रवाशांना एसटी बसने प्रवास करण्यासाठी आजपासून मुभा देण्यात आली आहे. गोंदियावरून भंडारा मार्गे नागपूर बस आज पासून सुरु झाली. उद्या पासून किंवा सोमवार पासून यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात ही बसेसच्या फेऱ्या सुरु होणार आहेत. बससेवा सुरू करण्यात आल्याने नागरिक आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंतरजिल्हा सेवा सुरु झाली असली तरी लालपरीला प्रवाशांची प्रतीक्षा करण्याची वेळ येणार आहे. गोंदियाच्या मुख्य बसस्थानकावरून ७ बसेस आज प्रवाशांना भंडारा आणि नागपूरला घेऊन गेल्या. कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर गत पाच महिन्यांपासून ठप्प असलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार बसेस सोडल्या जाणार आहेत.
राज्य शासनाने ६ मे पासून परिवहन महामंडळाला आंतरजिल्हा फे-यांची परवानगी दिली होती व त्यामुळे आतापर्यंत लालपरी फक्त जिल्ह्यात फे-यांच्या बंधनात राहूनच धावत होती. मात्र, आज पासून आंतरराज्य फे-यांची परवानगी देण्यात आली आहे.
आंतरराज्य फे-यांची परवानगी मिळाल्यानंतर गोंदिया आगाराने आज पासून ७ फे-यांचे नियोजन केले आहे. यामध्ये सकाळी ७:३० वाजता साकोली-भंडारा-नागपूर फेरी,