मुंबई- अल्पवयीन मुलींचे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट बनवणे तसेच इतर अल्पवयीन मुली व महिलांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करुन ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केलेली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला मिळालेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात गुजरात मधून अल्फाज अन्वरली जमानी (20) या आरोपीला 5 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेली आहे,अशी माहिती सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीने स्वतःचे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट बनवले होते. यामध्ये त्याने स्वतः अल्पवयीन मुलगी असल्याचे भासवून त्याद्वारे अनेक अल्पवयीन मुलींशी व महिलांशी त्याने मैत्री केली होती. मैत्री झाल्यानंतर अल्पवयीन मुलींचे फोटो मागूवून त्यांचे फोटो मोर्फ करून ते फोटो अल्पवयीन मुलींना परत पाठवत होता. या वेळी हेच फोटो इतर इंस्टाग्राम अकाऊंट वर प्रसारित होत असल्याचे सांगत तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. या दरम्यान अल्पवयीन मुली व महिलांचे अश्लील फोटो स्वतःकडे हा आरोपी मागून घेत होता. अल्पवयीन मुली व महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ मिळाल्यानंतर त्या फोटोच्या माध्यमातून हा त्यांचे लैंगिक शोषण सुद्धा करू लागला होता.