महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चढ्या दराने मास्कची विक्री करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई

गेल्या काही महिन्यांपासून मास्कची मागणी प्रचंड वाढली असून मास्कची विक्री चढ्या दराने होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आता आपला मोर्चा मेडिकल दुकानांकडे वळवला आहे.

inspection-of-medical-shops-across-the-state
चढ्या दराने मास्कची विक्री करणाऱ्याविरोधात होणार कारवाई

By

Published : Oct 24, 2020, 9:40 PM IST

मुंबई -कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क हे प्रमुख शस्त्र मानले जाते. त्यामुळे मास्क लावणे सर्वांसाठी गरजेचे आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मास्कची मागणी प्रचंड वाढली असून मास्कची विक्री चढ्या दराने होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आता आपला मोर्चा मेडिकल दुकानांकडे वळवला आहे. सात दिवसांत मेडिकल दुकानांची तपासणी करत किंमतीपेक्षा जास्त दरात विक्री करण्याऱ्या दुकानांची तपासणी करत योग्य कारवाई करण्याचे आदेश नवनियुक्त एफडीए आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आता सोमवारपासून मुंबईसह राज्यभरातील मेडिकल दुकानांची तपासणी होणार आहे.

मास्कची मागणी वाढल्याने सहाजिकच मास्कच्या किंमती ही वाढल्या आहेत. साध्या मास्कपासून एन 95 मास्कपर्यंत सर्व मास्क चढ्या दराने विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मास्कची विक्री किंमतही निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर विक्री किंमतीपेक्षा अधिक दरात मास्क विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता एफडी आयुक्त ए आर काळे यांनी राज्यभरातील सह आयुक्तांना आणि इतर अधिकाऱ्यांना आदेश देत मेडिकल दुकानांची तापणसी करण्याचे आदेश देणारे एक पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार पुढील सात दिवसांत मेडिकल दुकानात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांनी सात दिवसांत यासंबंधीचा अहवाल सादर करावा असेही आदेश या पत्रात दिले आहेत. तर नियमांचा भंग करत विक्री किंमतीपेक्षा अधिक दरात मास्कची विक्री करणाऱ्या दुकानांविरोधात कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.

या निर्णयाला मेडिकल चालकांसह फार्मासिस्टचा जोरदार विरोध


आता सोमवारपासून या कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती डी. आर. गहाणे, सहआयुक्त, बृहन्मुंबई (औषध), एफडीए यांनी दिली आहे. या पत्रानुसार मेडिकल दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय एफडीएने घेतला असला, तरी आता या निर्णयाला मेडिकल चालकांसह फार्मासिस्टनी जोरदार विरोध केला आहे. मास्कची विक्री मागील सात महिन्यांपासून होत आहे, तर सध्या रस्त्यावर, किराणा दुकान, स्टेशनरी, कपड्याचे दुकान अशी कुठेही साध्या मास्कपासून एन-95 मास्कची विक्री होत आहे. मुळात हे मास्क योग्य दर्जाचे आहेत का, ते विक्री किमतीत विकले जातात का, याची कुठलीही शाश्वती नाही. यांच्यावर कुणाचे नियंत्रण नाही, असे असताना त्यांना सोडून नोंदणीकृत, परवानाधारक मेडिकल दुकानांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी शशांक म्हात्रे यांनी केला आहे. कोरोनाची दहशत संपत असताना, रुग्ण कमी होत असताना ही कारवाई का, असे म्हणत त्यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details