मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यात चोरमंडळ असल्याचे वादग्रस्त विधान संजय राऊतांनी केले होते. याविरुद्ध शिंदे गट आणि भाजपने विधानभवनात निदर्शने केली. तसेच, राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणत यांच्याकडून खुलासा मागवला होता. दरम्यान, संपूर्ण विधिमंडळाला नव्हे तर शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांना चोर म्हटल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी केले होते. सरकारने त्यानंतर संबंधित हक्कभंगावर कार्यवाहीसाठी राज्य सरकारने भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती नेमली. समितीत राऊत यांच्यावर आरोप केलेल्या आमदारांची नियुक्ती केली गेली. विरोधकांनी याविरोधात आवाज उठवला. मात्र, सरकारने समिती सदस्य कायम ठेवत आता राऊत यांच्या विरोधात कार्यवाही सुरू केली आहे. समिती राऊत यांच्या विधानांची चाचपणी करून निर्णय घेणार आहे.
नार्वेकरांवर राऊतांची टोचकी विधाने: राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निकालानंतर विधानसभा अध्यक्षाकडून सातत्याने प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्याने संजय राऊत यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली होती. नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. एवढेच नव्हे तर नार्वेकर यांना पक्षांतराचा छंद असून बेकायदेशीरपणे पक्षांतर करणाऱ्यांना ते पाठीशी घालत असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला होता. वकिली पेशा असलेल्या नार्वेकरांना विहित वेळेत निकाल देण्यास विलंब होत असल्यास त्यांनी वकिलीची सनद पेटीत बंद करावी, अशीही बोचरी टीका राऊतांनी केली होती.
राऊतांविरुद्ध दुसरा हक्कभंग दाखल:शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊतांच्या विधानांवर आक्षेप घेत, दुसरा हक्कभंग दाखल केला. विधानसभा अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करत नाहीत. विधिमंडळातील सर्वच पक्षाचे ते पीठासन अधिकारी आहेत. त्यामुळे खोटे, बेफाम आरोप करून अध्यक्षांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम संजय राऊत करत आहेत, असा आरोप शिरसाटांनी केला होता. राहुल नार्वेकर यांना यासंदर्भात पत्र व्यवहार करत कारवाईची मागणी देखील शिरसाटांनी केली होती. विधानसभा अध्यक्षांनी या पत्राची दखल घेत, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.
कोण आहेत राहुल कुल?भाजप आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. हे सर्व पुरावे आता 'सीबीआय'कडे देऊन कारवाईची मागणी केली होती. विरोधकांना 2 ते 5 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली होती. मात्र, कुल यांनी 500 कोटींचा घोटाळा केला असताना, कारवाई केली जात नसल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. आता कुल यांनाच हक्कभंग समितीचे अध्यक्ष पद दिल्याने समितीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Sanjay Raut Inquiry : संजय राऊतांवर हक्कभंग समितीच्या चौकशीचा ससेमिरा; दोन हक्कभंगाबाबत होणार कार्यवाही - संजय राऊत चौकशी
राज्य विधिमंडळ आणि विधानसभा अध्यक्षाविरोधात खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले होते. राज्य सरकारने या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू केल्याने संजय राऊत अडचणीत आले आहेत. सत्तासंघर्षानंतर राऊत यांनी सरकारची कोंडी केल्याने त्यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
संजय राऊत
हेही वाचा:
- J P Nadda On Skill Development : युवकांसाठी कौशल्य विकास ही काळाची गरज- जे. पी. नड्डा
- Reel Shooting On Bike: धावत्या दुचाकीवर आंघोळीचा 'रील' शूट करणे तरुण-तरुणीच्या अंगलट; जाणून घ्या रिलस्टारचा काय आहे प्रकरण
- Honey Trap Case : हवाई दलातील अधिकारी निखिल शेंडे यांचा हनी ट्रॅप प्रकरणाशी काहीही संबंध नाही - लीला शेंडे