मुंबई : 3 जूनला दुपारी 2.30 च्या वाजण्याच्या दरम्यान खार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेठ ईसरदास वरंदमल धर्मशाळेमध्ये एका मुलीने स्वत:चा हात कापून घेतला. खार पोलिसांना कॉल प्राप्त होताच निर्भया पथकाला याची माहिती दिली गेली. टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा साधारण १५-१६ वर्षे वयोगटातील एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. तिने डाव्या हातावर सात ते आठ ठिकाणी कापल्याचे दिसून आले.
महिला कॉन्स्टेबलची तत्परता :या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खार निर्भया पथकाचे पोलीस निरीक्षक पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक मोरे यांना कळविले. यानंतर महिला पोलीस शिपाई माथरे यांनी या मुलीस हातावर उचलून पहिल्या मजल्यावरून खाली आणले. लगेच तिला पोलीस वाहनातून तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे ठाणे अंमलदार पोलीस उपनिरिक्षक मोरे यांनी मदत करत डॉक्टरांना तात्काळ औषधोपचार करण्यास सांगितले. यामुळे ही मुलगी शुद्धीवर आली आणि तिच्या जखमांवर मलमपट्टी करून तिला सुस्थितीत आणले गेले.
महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या कामाचे कौतुक :खार निर्भया पथकाने सदर मुलीस पुढील तपासाकरिता पोलीस ठाण्यात आणले. तिला येथे ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या ताब्यात दिले गेले. यावेळी निर्भया पथक स्टाफ सहाय्यक फौजदार तेरवणकर, पोलीस हवालदार मजवेलकर, महिला पोलीस शिपाई म्हात्रे, पोलीस निरीक्षक घार्गे हे उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी देखील महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.