मुंबई:'हॉट डॉग' हा पदार्थ नेमका कसा असतो? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, तो आपल्याकडे ज्या पद्धतीने बनवून मिळतो ती ऑथेंटिक पद्धत नाही. आपल्याकडे हॉट डॉग बद्दल आकर्षण असणारे अनेक खवय्ये आहेत. या खवय्यांना परदेशात जो 'ऑथेंटिक हॉट डॉग' मिळतो तसा 'ऑथेंटिक हॉट डॉग' मुंबईतील स्ट्रीट फूडमध्ये मिळावा, यासाठी मुंबईच्या एका तरुणाने छोटा स्टार्टअप सुरू केला आहे. मुंबईच्या मालाड येथे राहणाऱ्या तरुणाने परदेशात मिळणारा 'ऑथेंटिक हॉट डॉग' मालाडच्या एव्हर शाईन भागात विकायला सुरुवात केली आहे.
डान्स करत बनवतो हॉट डॉग:मुंबईकरांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत परदेशी पदार्थ 'हॉट डॉग' खायला देणाऱ्या या तरुणाचे नाव आहे अभिषेक वाधवा. अभिषेक डान्सर असून, तो डान्स करत आपल्या हॉट डॉगच्या दुकानात डान्स करत पदार्थ बनवतो आणि डान्स करतच ते लोकांना खाण्यासाठी सर्व्ह करतो. त्याची ही पद्धत अनेकांना आवडत असून, मुंबईकर सध्या अभिषेकच्या या स्टार्टअपकडे आकर्षित होत आहेत. फक्त डान्स करून काही भागत नसल्याने सोबत आणखी काहीतरी केले पाहिजे असे अभिषेकच्या मनात आले आणि त्याने मुंबईच्या रस्त्यांवर 'हॉट डॉग' विकण्याचा निर्णय घेतला.
आवड म्हणून तो बनला वेटर:पुढे बोलताना अभिषेकने त्याच्या प्रवासाबाबत सांगितले की, बारावी नंतर मी बॅचलर ऑफ मास मीडियाची डिग्री घेण्यासाठी प्रवेश घेतला. दोन वर्षे नियमित कॉलेजला गेलो. तिथे माझ्या बोलण्याची, प्रेझेंटेशनची शैली विकसित झाली. त्यातच मी लहानपणापासून डान्सर असल्याने माझे या क्षेत्रात मन लागत नव्हते. अखेर घरच्यांशी बोलून मी कॉलेज सोडले आणि एक रेस्टॉरंट जॉईन केले. तिथे मी वेटर म्हणून काम केले. आपल्या देशात एखाद्या ठिकाणी वेटर म्हणून काम करणे हे खालच्या दर्जाचे काम म्हणून पाहिले जाते. मात्र, तेच परदेशात एखाद्या रेस्टॉरंटमध्ये काम करणे ही एक पॅशन किंवा एक आवडीचे काम म्हणून केले जाते. तिकडे अनेक जण असे आहेत जे दिवसातून काही वेळ का होईना फ्रीमध्ये एखाद्या रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करतात.