मुंबई:विमानात प्रवास करताना बेशिस्त पद्धतीने प्रवास करण्याच्या घटना सतत वाढत आहेत. विमानातून बेशिस्त पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. बँकॉकहून इंडिगोच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका स्वीडिश वृद्ध प्रवाशाने केबिन क्रू सदस्याचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी प्रवाशाला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.
गुन्हा दखल, जामीन : गुरुवारी बँकॉकहून इंडिगो विमानाचा चार तासांचा प्रवास करून स्वीडिश नागरिक असलेला एरिक हॅराल्ड जोनास वेस्टबर्ग हा ६३ वर्षीय नागरिक मुंबईत येत होता. या प्रवासादरम्यान वेस्टबर्ग याने एका २४ वर्षीय केबिन क्रू सदस्याचा विनयभंग केला. यावेळी त्याला इतर केबिन क्रू सदस्यांनी हटकले असता त्यांच्यावर हल्ला केला. घटनेच्या वेळी वेस्टबर्ग हा मद्यधुंद अवस्थेत होता.
जामिनावर सोडले : विमान मुंबईत पोहचताच वेस्टबर्ग याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विनयभंग झालेल्या क्रू सदस्याच्या तक्रारीवरून वेस्टबर्ग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात सादर केले असता त्याला २० हजार रुपयांच्या जामिनावर सोडले आहे. जामिनावर सुटल्याने त्याला आता दरवेळी सुनावणी दरम्यान कोर्टात हजर रहावे लागणार आहे.