मुंबई : मुंबईच्या लोकलमधून पडल्यामुळे दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला अखेर खरेखुरे दोन्ही हात आज मिळाले आहेत. मोनिकावर आज(शुक्रवार) परळच्या ग्लोबल रुग्णालयात दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले. तब्बल 15 तासांहून अधिक काळ ही शस्त्रक्रिया सुरू होती. एकावेळी दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाची ही मुंबईतील पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. तर मोनिकाला तिचे दोन्ही हात परत मिळाल्याने ही खूप आनंदाची बाब ठरली आहे.
भाजप नेते किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया... 2014 मध्ये मोनिका घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल पकडताना पडली आणि लोकलखाली तिचे दोन्ही हात आल्याने तिला हात गमवावे लागले. त्यानंतर काही वर्षांनी कृत्रिम हात बसविण्यात आले. पण, तिला गरज होती ती खऱ्या हातांची. त्यामुळे तिच्यावर प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेत त्यासाठी प्रक्रिया सुरू करत हात मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आज हे प्रयत्न यशस्वी ठरले असून आज तिला दोन्ही हात मिळाले आहेत. ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांना याचे यश जात असले, तरी खरे यश आहे ते ब्रेन डेड झालेल्या आपल्या मुलाचे दोन्ही हात दान करणाऱ्या चेन्नईतील कुटुंबाचे आहे.
चेन्नईतील एका रुग्णालयात 32 वर्षीय तरुण ब्रेन डेड झाला. याची माहिती मिळाल्याबरोबर त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधत मोनिकासाठी हात दान करण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी यासाठी परवानगी दिल्यानंतर तत्काळ ग्लोबल हॉस्पिटल आणि इतर यंत्रणा कामाला लागल्या. शुक्रवारी मध्य रात्री 1.40 मिनिटांनी दोन्ही हात चार्टड विमानाने चेन्नईवरून मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर ग्रीन कॉरिडोर करत 15 मिनिटांत ते ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान 12 डॉक्टरांची टीम तयारच होती.
या टीमचे नेतृत्व ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांच्याकडे होते. या टीमने रात्री 2 वाजता प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू केली आणि 15 तासांनंतर अर्थात सायंकाळी 5 नंतर शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला इन्टेन्सिव केअर युनिटमध्ये हलविण्यात आले आहे. हॅन्ड ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून 'स्वत:चे हात, नया जीवन' अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैया यांनी यावेळी दिली आहे.
हेही वाचा -गुड न्यूज...! उद्यापासून मुंबईतील पाणी कपात रद्द, नियमित पाणीपुरवठा होणार