मुंबई- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांना मोफत पीपीई किट देण्यात येतील, अशी घोषणा राज्य सरकारने केली. ही घोषणा करून बरेच दिवस उलटले तरी मोफत पीपीई किट खासगी डॉक्टरांना मिळालेले नाहीत. त्यामुळे, महागडे किट स्वतः खरेदी करत डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. यावर आता इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राने नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने लवकरात लवकर मोफत पीपीई किट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पीपीई किट मिळत नसल्याने तसेच रोज महागडे किट खरेदी करणे परवडत नसल्याने अनेक खासगी डॉक्टर घरी बसून आहेत. तर दुसरीकडे सरकार त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारत आहे. त्यामुळे, आयएमएने पीपीई किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी सरकारने मान्य केली. पण प्रत्यक्षात धारावी वगळता मुंबईसह राज्यभरात कुठेही खासगी डॉक्टरांना मोफत पीपीई किट मिळालेले नाहीत, अशी माहिती आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. भोंडवे यांनी दिली आहे.