मुंबई : माध्यमांशी बोलताना गिलचे वकील अॅडव्होकेट अली काशिफ खान देशमुख यांनी आरोप केला की, शॉने सपनाला बॅटने मारले. फाइव्ह-स्टार हॉटेलमध्ये सपना गिल पृथ्वी शॉकडे चाहता म्हणून सेल्फी घेण्यासाठी गेली होती. तेव्हा ते पार्टी करत होते, पृथ्वी शॉ दारूच्या नशेत होता आणि त्याच्या हातात बॅट होती. त्याने आपल्या बॅटने सपनाला मारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पोलिसांकडे गेला आणि गुन्हा दाखल केला, असा दावा देशमुख यांनी केला.
क्रिकेटपटूवर गुन्हा दाखल करणार : वकिलाने पुढे सांगितले की, ते क्रिकेटपटूवर गुन्हा दाखल करणार आहेत. आता आम्ही पृथ्वी शॉवर गुन्हा दाखल करू, कारण तो नशेत होता. त्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली. त्याने एका दुचाकीलाही धडक दिल्याचे आम्हाला समजले आहे. त्याने सपनाला बॅटने मारले आहे. आम्ही त्याच्यावर कलम 354, 509 आणि 334 अंतर्गत गुन्हा दाखल करू. सपना गिल आणि पृथ्वी शॉ यांचा एकमेकांशी पूर्वीचा संबंध नाही, ती फक्त सेल्फी घेण्यासाठी गेली होती. आम्ही जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर आम्ही क्रिकेटपटूविरुद्ध एफआयआर दाखल करू, असे ते पुढे म्हणाले.
आठ जणांवर गुन्हा :पोलिस उपायुक्त अनिल पारसकर म्हणाले, मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी फिर्यादीच्या कारचे नुकसान केले. नंतर प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेल्फी घेण्यास नकार दिल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर हल्ला केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉ कारमध्ये असताना आरोपींनी हल्ला केला. नंतर शॉ यांना दुसऱ्या कारमध्ये पाठवण्यात आले होते. आरोपींनी पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीचाही पाठलाग केला होता.