मुंबई:'जागतिक तंबाखू विरोधी दिन' हा 31 मे रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर प्रयत्न केले जातात. वास्तविक तंबाखू सेवनामुळे तोंडाची दुर्गंधी आणि अस्वच्छतेसह अनेक गंभीर आजार उद्भवतात. यामुळे तंबाखू सेवन टाळल्यास कर्करोगासारख्या अत्यंत गंभीर अशा रोगापासून मुक्तता होऊ शकते, असा दावा बॉम्बे हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. भरत भोसले यांनी केला आहे.
तंबाखू आणि धूम्रमानाचे बळी:भारतातील 40 टक्के लोकांना होणारा तोंडाचा आणि फुफुसाचा कर्करोग हा केवळ तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ तसेच धूम्रपानामुळे होतो. सध्या देशात मिझोराम हे तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगात सर्वांत आघाडीवर असलेले राज्य आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण म्हणूनच अधिक आढळते. मुंबईसारख्या महानगरांमध्ये हवेचे प्रदूषण आणि धूम्रपानाचे प्रमाण जास्त आहे. उघड्या जागेवर होणाऱ्या धूम्रपानामुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीही कर्करोगाच्या बळी ठरतात. त्यामुळे उघड्यावरील धूम्रपान आणि प्रदूषण टाळले पाहिजे, असे मत डॉ. भोसले यांनी मांडले.
अद्ययावत उपचार पद्धती:कर्करोगाच्या उपचार पद्धतीमध्ये अलीकडे आमूलाग्र बदल झालेला आहे. नवीन 'इम्युनो थेरपी' आल्यामुळे कर्करोगावर उपचार करणे आता अधिक सोपे झाले आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हा रोग उघडकीस आला तरीही त्यावर उपचार शक्य आहे. यातून रुग्णाचे आयुष्य पाच ते दहा वर्षांनी वाढवता येते. मात्र, त्यासाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार व्हायला पाहिजे, असेही डॉ. भोसले म्हणाले.