मुंबई India GDP: मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसनं दोन दिवसांपूर्वी देशाचा जीडीपीचा अहवाल सादर करताना म्हटलं की, देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.7 टक्के कायम असेल. मात्र आगामी काळात देशात मागणीत वाढ झाल्यास जीडीपीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भारताचा यावर्षी आर्थिक विकास दर 6.7 टक्के राहील. मात्र पुढील वर्षी म्हणजे 2024 या वर्षात विकास दर 6.7 टक्क्याहून 6.1 टक्के राहील. म्हणजे थोडाफार फरक जाणवेल, असं रेटिंग एजन्सी मूडीजनं अंदाज व्यक्त केला आहे. तर 2025 मध्ये विकास दर वाढण्याची शक्यता आहे.
जीडीपी वाढण्याची शक्यता कमीच: एकिकडं मूडीजनं जीडीपीबाबत आशावाद दाखवला आहे, तर दुसरीकडं मूडीजच्या या अहवालाबाबत अर्थतज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. "सध्या मागणीत वाढ आहे आणि ही वाढ फक्त हंगामी आहे. ही वाढ अशीच कायम राहील याची काही शाश्वती नाहीय, त्यामुळं जर मागणी अशीच कायम राहिली तर जीडीपीबाबत मात्र सुधारणा होऊ शकेल. अन्यथा जीडीपीत वाढ होणं शक्य नाही", असं अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी म्हटलं आहे. तर "मूडीजचा हा अहवाल सरकारधार्जिणा आहे. जीडीपी जो सध्या 7.6 दाखवला जातोय, त्यापेक्षा देखील कमी आहे. मात्र तो अधिक दाखवला जातोय. मूडीजनं व्यक्त केलेला अंदाज खरा होईल किंवा जीडीपी वाढेल, असं मला वाटत नाही", असं मत बँकिंगतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटलं आहे.
सर्व्हिस क्षेत्राचा जीडीपीला मोठा हातभार :मूडीजच्या जीडीपीबाबत या अहवालावर अर्थक्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत असताना, "देशाच्या आर्थिक सकल उत्पन्नात विविध क्षेत्राचा हातभार असतो. तर कृषी क्षेत्राचा मोठा वाटा हा जीडीपी वाढण्यासाठी असतो. मात्र मागील काही वर्षापासून शेती व्यतिरिक्त आता सर्व्हिस इंड्रस्टीजचा देखील जीडीपीसाठी 40 ते 50 टक्के वाटा असतो. तसेच पावसावर शेतीचं उत्पन्न अवलंबून असते. पण शेतीतून जरी उत्पन्न कमी झालं तरी, त्याचा फारसा परिणाम जीडीपीवर दिसणार नाही" असं सीए, निखिलेश सोमण, शेअर बाजार अभ्यासक, यांनी म्हटलं आहे.