इंडिया फ्रंट मार्च पोलिसांनी अडवल्यानंतर राकॉं नेत्या विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया मुंबईIndia Front March:देशातील 'एनडीए' व त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात नव्याने एकजूट झालेल्या 'इंडिया' आघाडीने मुंबईत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोदी सरकार विरोधात "मै भी गांधी" या नावाने शांतता मोर्चाचे आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा पासून मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष व इतर घटक पक्ष सामील झाले होते.
पोलीस आणि कार्यकर्त्यात 'तु तु मैं मैं':हजारो कार्यकर्त्यांचा मोठा जमाव या पदयात्रेच्या निमित्ताने मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळील रस्त्यावर उतरला होता. दुसरीकडे पोलिसांनी सुध्दा या पदयात्रेच्या निमित्ताने मोठा फौजफाटा तैनात केला होता. सुरुवातीलाच मेट्रो सिनेमा जवळ या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलीस तसेच कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. या कारणामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
दोन तास रस्त्यावर ठिय्या:पोलिसांनी मोर्चेकरांना रिगल सिनेमा पासून गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत जाण्यास परवानगी दिली होती. परंतु, मेट्रो सिनेमा पासून पुढे जाण्यास 'सायलेन्स झोन'च्या निमित्ताने त्यांना परवानगी नाकारली होती. पोलिसांनी समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आजमी यांना सुरुवातीलाच ताब्यात घेतलं. त्यानंतर इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या कारणास्तव आंदोलकांनी फॅशन स्ट्रीट जवळ रस्त्यावरच जवळपास दोन तास बसून गांधीजींची भजनं गायला सुरुवात केली.
'इंडिया' आघाडीच्या नेत्यांकडून निषेध:यावर बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पदयात्रा सुरू होण्याआधीच पोलिसांनी दंडेलशाही सुरू केली व आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. ही पदयात्रा पूर्णपणे शांततेने होणार असताना कार्यक्रमाला कोणत्याही कारणाविना मज्जाव करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारा आहे. तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण म्हणाल्या की, शांततेने सुरू असणारं आमचं आंदोलन हे दडपण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे. पोलीस प्रशासन मुंबई व महाराष्ट्रात दंगे पसरवू पाहत आहेत. गृहखातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून काल त्यांनी सर्वत्र स्वच्छतेच्या नावावर नौटंकी करण्याचं काम केलं. 'इंडिया' आघाडीची ताकत ही दिवसेंदिवस वाढत आहे. तर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत की, शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. लोकशाहीमध्ये आम्हाला शांततेच्या मार्गाने आमची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण तो अधिकार आमच्या हातून हिरावून घेण्याचे काम सरकार करत असून जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
अखेर पोलिसांची परवानगी:पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना व नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु ते आपल्या मोर्चावर ठाम असल्या कारणाने कुठल्याही परिस्थितीत काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर आंदोलनकर्त्यांचा वाढता दबाव व मोर्चेकर्यांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी त्यांना पदयात्रेसाठी परवानगी मंजूर केली. पदयात्रेची सांगता मंत्रालया शेजारील असलेल्या गांधी पुतळ्याजवळ झाली.
हेही वाचा:
- Nitesh Rane On Sanjay Raut : ... तर संजय राऊतांना त्यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन प्रश्न विचारणार; नितेश राणेंचा इशारा
- Chhagan Bhujbal : मला एकट्याला टार्गेट केलं जातंय - छगन भुजबळ
- MNS Loksabha Election २०२४ : लोकसभेसाठी 'मनसे'ची प्लॅनिंग; 'या' दोन मतदारसंघांवर नजर?