मुंबई:केंद्रातील भाजपा सरकार विरोधात 'इंडिया' या विरोधी पक्षांच्या आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होणार आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झालीय. 'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील बैठकीत लोगोनंतर 'इंडिया' आघाडीच्या समन्वयक पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत. निवडणुका जवळ आल्यानं मला वाटतं या सर्व बैठका महत्त्वाच्या आहेत. आम्हाला आता शेवटचा रोडमॅप तयार करावा लागेल. जागावाटपाची घाई नको, असे यावेळी फारुख अब्दुल्ला माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Live Updates-
- मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीबाबत आपचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीत माध्यमांशी प्रतिक्रिया दिलीय. मंत्री भारद्वाज म्हणाले, ही युती टिकणं अवघड असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे. मात्र, ही युती टिकली तर केंद्रात भाजपा स्थापन करू शकणार नाही.
- इंडियाच्या आघाडीच्या बैठकीकरता आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव मंगळवारीच मुंबईत पोहोचले आहे. माध्यमांशी बोलाताना लालूप्रसाद यादव म्हणाले, निवडणुका जवळ येत असताना आगामी काळाची तयारी करणे हा आमचा अजेंडा असणार आहे. उमेदवार ठरवायचे असतील तर राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे."
- 'इंडिया' आघाडीत सामील होणार नसल्याचा पुनरुच्चार बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केलाय. 'एनडीए' आणि 'इंडिया' आघाडीतील बहुतांश पक्ष हे गरीबांच्या विरोधात, जातीयवादी, भांडवलशाही धोरण असलेले आहेत. त्यांच्या धोरणांविरुद्ध बसपा सातत्याने संघर्ष करत आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी भूमिका मायावती यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट करत मांडलीय.
- महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदमुंबई येथे 31 ॲागस्ट आणि1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीबाबत माहिती देण्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद आहे. ही पत्रकार परिषद आज दुपारी 4 वाजता ग्रॅंड हयात हॅाटेल वाकोला मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून बैठकीचे नियोजन सुरू-'इंडिया' आघाडीची बैठक मुंबई येथे ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडीतील घटक पक्ष तयारीला लागले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून वेगवेगळे प्रकारच्या बैठका घेत कार्यक्रमांचं नियोजन करत होते. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आढावा बैठक बुधवारी रात्री हॉटेल ग्रँड हयात येथे पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.