मुंबई India Aghadi Meeting : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर 15 दिवसांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांची आघाडी म्हणजेच 'इंडिया आघाडी'ची चौथी बैठक दिल्ली इथं आज होणार आहे. इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटणा इथं झाली होती. त्यानंतर बंगळुरू आणि मुंबई इंथं आघाडीच्या बैठका झाल्या. दिल्लीत होणाऱ्या बैठकीच्या एक दिवस आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उबाठा गट ), आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, जेडीयू नेते नितीश कुमार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचले आहेत. सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट :सोमवारी संध्याकाळी आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह इतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केजरीवाल यांनीही सौजन्य भेटीदरम्यान देशातील 'राजकीय समस्यां'वर चर्चा झाली, असं सांगितलं. या नेत्यांमध्ये केजरीवाल यांच्या निवासस्थानी 45 मिनिटे चर्चा झाली.