मुंबई Mohammed Shami News : क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 70 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात सर्वबाद 327 धावाच करू शकला. या विजयासह भारतानं रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. दरम्यान, या विजयासाठी जितकी विराट कोहली अन् श्रेयस अय्यरच्या शतकांची चर्चा होत आहे, तितकीच चर्चा मोहम्मद शामीच्या घातक गोलंदाजीचीही होत आहे. एकीकडं मोहम्मद शामीवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. तर दुसरीकडं शामीबाबत दिल्ली पोलिसांनी एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) मुंबई पोलिसांना टॅग करुन केलेल्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी केली पोस्ट-एकदिवसीय सामन्यात सात विकेट घेणारा मोहम्मद शामी पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. तसंच शामीचे 7/57 चे आकडे हे एकदिवसीय आणि एकदिवसीय विश्वचषकातील भारतीयांचं सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. शामीच्या या कामगिरीमुळं त्याच सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. असं असतानाच दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी मोहम्मद शामीच्या गोलंदाजीबाबत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांना उद्देशून दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की, मोहम्मद शामीला अटक करू नका.