मुंबई India Vs Australia World Cup 2023 : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार रंगणार आहे. भारतात क्रिकेटला उत्सवाप्रमाणं साजरं केलं जातं. प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपल्या स्टाईलमध्ये मेन इन ब्ल्यूला सपोर्ट करतोय. टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये असून याच पार्श्वभूमीवर विविध स्तरातून त्यांना आजच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनिया गांधी यांच्याकडून व्हिडिओद्वारे संदेश :अहमदाबाद येथे फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी तयार असलेल्या भारतीय संघाला सोनिया गांधींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांचे मनापासून कौतुकही केले. त्यांनी एक्स या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, भारतीय क्रिकेट संघानं देशाला सातत्याने गौरव मिळवून दिल्याबद्दल आणि देशाच्या हृदयात सामूहिक आनंद आणि अभिमान जागवल्याबद्दल त्यांनी संघाचं कौतुक केलं. तसंच त्या म्हणाल्यात की, प्रिय टीम इंडिया, मी या वर्ल्डकपदरम्यान तुम्ही अविश्वसनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट टीम वर्क दाखवून दिलं. तुम्ही सातत्याने देशाची प्रतिमा उंचावलीय. आम्हाला आनंदित होण्याची संधी दिली. तुमच्या फायनल सामन्यासाठी तयार संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देते. तुमच्याकडं वर्ल्डकप चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे. टीम इंडियाला शुभेच्छा. जय हिंद!
- काय म्हणाले देवेंद्र फडणवीस :उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी देखील आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर केली असून 'ऑल द बेस्ट टीम इंडिया' असं ते म्हणाले आहेत. यासह त्यांनी सेमी फायनलचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ऑल द बेस्ट टीम इंडिया! 140 कोटी भारतीयांकडून तुमचा जयजयकार सुरू आहे. तुम्ही देदिप्यमान व्हा, चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा.