मुंबई -राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
मुंबईत म्यूकरमायकोसिस 111 रुग्ण -
कोरोना नियंत्रणात येत असतानाच कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 'म्युकरमायकोसिस' आजार होण्याचे प्रकार समोर आले आहेत. या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार होणे गरजेचे असते. मुंबईत सद्यस्थितीत 'म्युकर मायकोसिस'चे 111 रुग्ण पालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालिकेच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये या रुग्णांचे निदान झाल्यानंतर तातडीने आवश्यक उपचार केल्यामुळे सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचारही सुरू असून त्यांना देखरेखीखाली ठेवले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अहमदनगरमध्येही 2 रुग्णांची नोंद -
जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात एक-एक म्युकर मायकोसिसचा रुग्ण आढळला असून जामखेडच्या रुग्णांवर नगरमध्ये तर श्रीगोंदा येथील रुग्णावर पुण्यात उपचार सुरू आहे.