मुंबई- महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात 200 मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. तसेच लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 10 टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्णशय्या यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट
राज्यात सध्या 6 लाख 63 हजार 758 सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील 78 हजार 884 रुग्ण ऑक्सिजनवर असून 24 हजार 787 रुग्णअतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 16 जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रीय रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केले जात असल्याचे मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.