मुंबई - करोना संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांचे उत्पादन थांबले. मोठ्या आर्थिक नुकसानाचा फटका देखील यावेळी सहन करावा लागला. मात्र, आता राज्यात सर्वत्र अनलॉक करण्यात आले. त्यामुळे हळू-हळू व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. वाहनविक्रीसारख्या क्षेत्रात राज्यभरात मोठी तेजी आल्याचे निदर्शनास आले आहे. दसरा, दिवाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनविक्री झाली. यामुळे परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा मिळाला आहे.
वाहनविक्रीला तेजी येण्याची 'ही' आहेत कारणे-
कोरोना काळात अनलॉक करत असताना वाहनविक्रीला परवानगी मिळाली होती. त्यामुळे ग्राहकांनी जुलैपासून गाडी खरेदीला पसंती दिली. ५ महिन्यांतील गाड्यांच्या स्टाॅकमुळे वेगवेगळ्या शो-रूमध्ये ग्राहकांना ॲान-डिमांड गाडी मिळत असल्याने विक्री वाढली आहे. यापूर्वी ग्राहकांना नवीन गाडी घरी येण्यासाठी प्रतिक्षा यादीत वाट बघावी लागत होती. आता लगेच गाडी घरी येत असल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीला पसंती दिलेली आहे.
परिवहन खात्याच्या तिजोरीत २ हजार २६८ कोटींचा महसूल-
गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली वाहन नोंदणी आणि अन्य करांतून आरटीओच्या तिजोरीत २ हजार ७६८ कोटी रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, यापैकी ९० टक्के महसूल हा वाहन नोंदणीतून मिळाला. यंदा एप्रिल ते १४ नोव्हेंबर या कालावधित एकूण ७ लाख ६५ हजार ९२७ वाहनांची नोंदणी झाली. तब्बल ७ लाख ३० हजार ५५ खासगी गाड्यांची नोंदणी झाली आहे. तसेच आतापर्यंत ३५ हजार ८८२ व्यावसायिक गाड्यांची नोंदणी झाली असून या नोंदणी झालेल्या गाड्यांच्या माध्यमातून राज्याला २ हजार ७६८ कोटी रुपये मिळाले आहेत.