मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या ( measles patients in Mumbai ) झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण २५२ रुग्णांची तर ३६९५ संशयित रुग्णांची तर १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईमधील पालिकेच्या २४ विभागापैकी ८ विभागात गोवरचा प्रसार होता. त्यात वाढ होऊन आता ११ विभागात गोवरचा प्रसार वाढला आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन - गोवरच्या हॉटस्पॉटची संख्या ( Increase in measles cases ) वाढली आहे. तसेच गेल्या चार दिवसात रोज एका लहान मुलाचा मृत्यू होत आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास आणि वेळेवर लसीकरण केल्यास गोवरचा प्रसार आणि मृत्यूचे प्रमाण रोखता येऊ शकते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगल गोमारे यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगल गोमारे यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना गोवरचे हॉटस्पॉट आणि मृत्यू वाढले - मुंबईत गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गोवंडी, चेंबूर, कुर्ला, मालाड, वडाळा माटुंगा, भायखळा, धारावी तसेच सांताक्रुझ या ८ विभागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने हे विभाग गोवरचे हॉटस्पॉट झाले आहेत. गेल्या काही दिवसात भांडुप, प्रभादेवी आणि अंधेरी पूर्व या तीन प्रभागांमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे सध्या पालिकेच्या २४ पैकी ११ विभाग गोवरचे हॉटस्पॉट झाले आहेत. आतापर्यंत एकूण २५२ रुग्णांची तर ३६९५ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. एकीकडे मुंबईतील गोवरची रुग्णसंख्या वाढत असताना गोवरमुळे मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या चार दिवसात गोवरने चार बालकांचा बळी घेतला आहे, मुंबईत एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण मृत्यूंपैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहेत.
या केल्या उपाययोजना - गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३३० बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत, अशी माहिती डॉ. मंगल गोमारे यांनी दिली.
२१ रुग्ण ऑक्सिजनवर व २ व्हेंटिलेटवर - मुंबईत ४६ लाख ३ हजार ३८८ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३६९५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले २५२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा , क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ९७ बेडवर रुग्ण असून २३३ बेड रिक्त आहेत. १४१ जनरल बेडपैकी ७१, १५४ ऑक्सीजन बेड पैकी २१, ३५ आयसीयु बेड पैकी ५ तर २० व्हेंटिलेट पैकी २ व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १९ हजार ९८० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत १० तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १० मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. २ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.