मुंबई -मुंबई, राज्याची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी. कधी न थांबणारी, वेगात पुढे जाणारी, दिवस रात्र आवाज करणारी मुंबई. पण ही मुंबई कधी नव्हे ती कोरोनामुळे शांत झाली. मार्चमध्ये देशात पहिले लॉकडाऊन सुरू झाले आणि मुंबईही शांत झाली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर होणारे ध्वनी प्रदूषण लॉकडाऊनमध्ये कमी होऊ लागले. लॉकडाऊन 3 मध्ये तर ध्वनी प्रदूषण खूपच कमी झाले. पण पुढे मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि मग मुंबईचा आवाज ही वाढू लागला. त्यामुळेच डिसेंबर 2020 मध्ये 64 डीबी ते 95.6 अशी मार्च ते डिसेंबर 2020 दरम्यानची सर्वाधिक आवाजाची पातळी नोंदवली गेली आहे.
मुंबईत मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. तर मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत ध्वनी प्रदूषण हा गंभीर विषय बनल्याचे चित्र आहे. 100 डीबीच्या वर मुंबईत आवाजाच्या पातळीची नोंद बऱ्याचदा होते. आवाज फाउंडेशनसारखी संस्था या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहे. दरम्यान लॉकडाऊन आधीच्या ध्वनी प्रदूषणाचा विचार केला तर जानेवारी ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 65 डीबी ते 105 डीबी अशी मुंबईतील आवाजाची पातळी होती. म्हणजे या काळात ध्वनी प्रदूषण बऱ्यापैकी होते.
लॉकडाऊनमुळे आवाजाच्या पातळीत घट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 22 मार्चपासून लॉकडाऊन लागले. रेल्वे, मेट्रो, मोनो, टॅक्सी-रिक्षा, शाळा-कॉलेज, कार्यालये सगळं काही बंद झाले. कधी नव्हे ते मुंबईतील सर्व रस्ते शांत होते. अत्यावश्यक सेवेसाठीच वाहतूक आणि इतर बाबी खुल्या होत्या. त्यामुळेच लॉकडाऊन 1 मध्ये (मार्च-एप्रिल) 41.7 डीबी ते 66 डीबी इतकी आवाजाची पातळी नोंदवली गेली. लॉकडाऊन 2 मध्ये ( एप्रिल-मे) 52.9डीबी ते 63.4 डीबी आवाजाची पातळी होती. तर लॉकडाऊन 3 आणिन 4 मध्ये (मे) 52 डीबी ते 56.4 डीबी आवाज नोंदवला गेला. ही आकडेवारी खूपच दिलासादायक होती. मुंबईतील ध्वनी प्रदूषण कधी नव्हे ते इतके कमी झाले होते. अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलाली यांनी दिली आहे.