मुंबई : राज्यात नव्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. नव्या विषाणूच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. राज्यात आज एच 3 एन 2 चे 18 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एच 1 एन 1 च्या रुग्णांचा आकडा 405 तर एच 3 एन 2 च्या रुग्णांचा आकडा 184 वर पोहचला आहे. राज्यात इन्फल्युएंझाचे एकूण 589 रुग्ण नोंद झाले आहेत. तर आज 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही मृत्यू संशयित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. राज्यात गेले काही महिने आटोक्यात असलेला कोरोना मार्च महिन्यापासून पुन्हा वाढू लागला आहे. तसेच 16 मार्चला राज्यात 226 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन 249 रुग्णांची नोंद झाली आहे.
इन्फल्युएंझाचे 184 रुग्ण : 1 जानेवारी ते 17 मार्च 2023 या कालावधीत इन्फल्युएंझाची लक्षणे असलेले 3,04,686 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1643 रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आले आहे. त्यात एच 1 एन 1 चे 405 तर एच 3 एन 2 चे 184 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 196 रुग्ण सद्या रुग्णालयात भरती आहेत. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत एच 1 एन 1 मुळे 3 मृत्यू झाले आहेत. एच 3 एन 2 मुळे अहमदनगर येथे 1 मृत्यू झाला होता. आणखी 3 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. वाशीम, खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणे येथे हे मृत्यू नोंदवले गेले आहेत. डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालानंतर हे मृत्यू एच 3 एन 2 मुळे झाले आहेत का हे समोर येणार आहे.
कोरोनाचे 249 नवे रुग्ण : राज्यात आज 18 मार्च रोजी 249 रुग्णांची नोंद झाली आहे. 113 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 1164 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 39 हजार 501 रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यापैकी 79 लाख 89 हजार 909 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 428 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 3 मार्चला 66, 7 मार्चला 80, 9 मार्चला 90, 10 मार्चला 93, 11 मार्चला 114, 12 मार्चला 101, 14 मार्चला 155, 15 मार्चला 176, 16 मार्चला 226, 17 मार्चला 197 रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत 71 रुग्णांची नोंद : मुंबईत आज 18 मार्च रोजी 71 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 246 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 55 हजार 774 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 781 रुग्ण बरे झाले आहेत तर 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 2 मार्चला 18, 9 मार्चला 18, 10 मार्चला 21, 11 मार्चला 25, 12 मार्चला 19, 14 मार्चला 36, 15 मार्चला 36, 16 मार्चला 31, 17 मार्चला 36 रुग्णांची नोंद झाली आहे.