मुंबई: १ जानेवारी ते २० मार्च २०२३ या कालावधीत इन्फल्युएंझाची लक्षणे असलेले ३,११,१९३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १७७७ रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आले. आतापर्यंत एच १ एन १ चे ४१७ तर एच ३ एन २ चे २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १६० रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. राज्यात एच १ एन १ या व्हेरियंटने ३ मृत्यू झाले आहेत. तर एच ३ एन २ या व्हेरियंटमुळे अहमदनगर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वाशीम, पुणे आणि पुण्याच्या खडकी कॅन्टोन्मेंट येथील ३ संशयित मृत्यूंची नोंद झाली असून डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालानंतर या ३ मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
३ संशयित मृत्यूची नोंद: आज राज्यात इन्फ्लुएंझाच्या एच १ एन १ चे १० तर एच ३ एन २ चे ३२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एच १ एन १ च्या रुग्णांचा आकडा ४१७ वर तर एच ३ एन २ च्या रुग्णांचा आकडा २४९ वर पोहचला आहे. राज्यात इन्फल्युएंझाचे एकूण ६६६ रुग्णांची नोंद झाले आहेत. एच ३ एन २ व्हेरियंटमुळे १ मृत्यू झाला असून ३ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे.