मुंबई - मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी रेल्वे आता डेथ लाईन बनत चालली आहे. दिवसेंदिवस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूमध्ये वाढ होतेय. २०१९ या संपुर्ण वर्षात रेल्वेच्या तिन्ही मार्गावरुन रोज प्रवास करताना किमान ८ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याचे धक्कादायक वास्वव समोर आले आहे. 2019 या वर्षी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर २ हजार ६९१ प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत.
प्रवाशांच्या मृत्यूला रेल्वेची वाढती गर्दी हे मुख्य कारण असून, तिन्ही रेल्वे मार्गावर सर्वात जास्त ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना सर्वात जास्त प्रवास मृत्यूमुखी पडले आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकात सर्वात जास्त ७३ रेल्वे प्रवाशांचा गर्दीमुळे धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एकूण २८ रेल्वे प्रवाशांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्यात ठाणे रेल्वे स्थानक हे सुसाईड पाँइंट झाले का? असा प्रश्न निर्माण होतोय.
मुंबईची लाईफ लाईन रेल्वे बनतेय 'डेथ लाईन' 2019 या वर्षी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर २ हजार ६९१ प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. याही वर्षी मध्ये रेल्वे मार्गावर सर्वात जास्त एकूण १ हजार ३९३ प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. तर, पश्चिम रेल्वेने प्रवास करताना एकूण ९२८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हार्बर रेल्वेने प्रवास करताना एकूण ३७० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वात जास्त ठाणे रेल्वे स्थानकात १३८ प्रवाशांचा मृत्यू झालेत. त्यानंतर, दिवा रेल्वे स्थानकात ९२, कल्याण रेल्वे स्थानकात ७७, कुर्ला रेल्वे स्थानकात ७७ प्रवाशांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वात जास्त बोरिवली रेल्वे स्थानकात ५६ प्रवाशांचे मृत्यू झालेत. अंधेरी रेल्वे स्थानकात ५५, विरार रेल्वे स्थानकात ५२, कांदिवली रेल्वे स्थानकात ४८ प्रवाशांचे मृत्यू झालेत. हार्बर रेल्वे मार्गावर सर्वात जास्त मानखुर्द रेल्वे स्थानकात ३४ प्रवाशांचे मृत्यू झालेत. वडाळा रोड रेल्वे स्थानकात २३, गोवंडी आणि वाशी रेल्वे स्थानकात प्रत्येकी २२, तर, जुईनगर रेल्वे स्थानकात २० रेल्वे प्रवाशांचे मृत्यू झालेत.
आश्चर्यकारक म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे रुळ ओलांडतना १ हजार ४५५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यात सर्वात जास्त कल्याण रेल्वे स्थानकात १९६ प्रवाशांचे रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेत ज्यात ६६ महिला प्रवासी आहेत. त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकात १७४, प्रवाशांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालाय ज्यात १३ महिला प्रवासी आहेत. बोरिवली रेल्वे स्थानकात १६० प्रवाशांचा, ज्यात २१ महिला प्रवासी आहेत . कुर्ला रेल्वे स्थानकात १५६ प्रवाशांचा, ज्यात २२ महिला प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे.