मुंबई Cyber crime :गेल्या तीन वर्षांत मुंबईसह राज्यात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. त्यामुळं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्र सायबर सेलकडे हेल्पलाइनच्या माध्यमातून राज्यभरातून तक्रारी येत आहेत.
दररोज 1 हजाराहून अधिक तक्रारी : याबाबत महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, 'सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर दररोज 1 हजाराहून अधिक फोन येत आहेत. त्यापैकी 300 ते 400 कॉलची गंभीरता पाहून गुन्हाची नोंद केली जाते'. गेल्या वर्षी या तक्रारींची संख्या 3 हजार 206 होती. मात्र, यावर्षी सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत असून, 16 हजार 166 तक्रारींचं गुन्ह्यात रुपांतर झालं आहे. गेल्या वर्षी याच तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेऊन 3 हजार 206 गुन्हे दाखल झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर तक्रारींमध्ये चौपट वाढ झाल्याचं दिसून येत आहे.