मुंबईMumbai Cyber Crime : लोभापायी लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. लॉकडाऊननंतर नोकरीच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये (Cyber Fraud) वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात एकीकडे लोक बेरोजगार होत होते. तर काही लोक अर्धवेळ नोकरी करून पैसे मिळवण्याचा मार्ग शोधत होते. तर दुसरीकडे ऑनलाइन फसवणूक करणारे गोड बोलून लोकांची फसवणूक करत होते. फसवणूक करणाऱ्यांची एक मोठी टोळी असून त्यात महिला आणि पुरुष दोघेही सामील आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत अशी आहे की, पीडितांना सर्वकाही खरे आहे असं वाटतं आणि ते त्यांच्या जाळ्यात अडकतात. सायबर क्राइम ब्रँचशी संबंधित एका महिला अधिकाऱ्यानं सांगितलं की, पश्चिम बंगाल आणि राजस्थानचे भरतपूर आणि मुर्गा मुंडा, नेपाळ बॉर्डर आणि पश्चिम बंगाल बॉर्डर हॉटस्पॉट बनले आहेत.
नोकरीची अशा दाखवून केली फसवणूक: 17 मार्चला वी फ्लाय यूट्यूब मार्केटिंग कंपनीची कर्मचारी म्हणून, पीडितेला टेलीग्राम युझर आयडीवरून +63 क्रमांकासह अर्धवेळ नोकरीची माहिती पाठवण्यात आली. तिला खूप मोठे कमिशन आणि बोनस दिला जाईल अशी बतावणी करण्यात आली. YouTube चॅनेलची सदस्यता घेतल्यावर पीडितेला प्रथम वर्गणीच्या नावावर कमिशन देण्यात आलं. परंतु लाखो कमावण्याचे लालच दाखवून पीडितेला हळूहळू 10 लाख 67 हजार 220 गुंतवायला लावले. त्यानंतर अचानक फसवणूक करणाऱ्यांचा पीडितेशी संपर्क तुटला आणि स्वत:ची फसवणूक झाल्याचं समजून पीडितेनं सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सायबर विभागाचे पोलिस निरीक्षक मौसमी पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन गच्छे यांनी कांजूरमार्ग परिसरात राहणाऱ्या सुमित सतीशचंद्र गुप्ताला अटक केली. तर देशभरात आरोपी आणि त्याच्या साथीदारांवर 80 गुन्हे दाखल आहेत.
टेलीग्राम अकाउंटवर फसवणूक : सायबर पश्चिम विभागात ८ मार्चला तक्रार नोंदवण्यात आली होती. ज्यात एका महिलेने पार्ट टाईम जॉबच्या नावावर टेलीग्राम अकाउंट @payrollofficer Surendr द्वारे +60 नंबरवरून पैसे गुंतवले होते. त्यानंतर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी रक्कम अदा करून एकूण 13 लाख 26 हजार 480 रुपयांची फसवणूक करण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांनी एक पथक तयार केलं. पोलिसांनी चेन्नई येथील रफिक मोहम्मद आणि तामिळनाडू येथील उदय रंजीत राजा यांना अटक केली. दोघांकडून ७ जुने मोबाईल जप्त केले.
जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधा :मुंबई सायबर विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. डी.एस.स्वामी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं आहे की, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्यांपासून खासकरून दूर राहावे आणि मोबाईल फोनवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते क्रमांक सांगू नये. तसेच पासवर्ड, OTP, KYC, डेबिट कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर आणि इतर कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करू नका. असं करण्यासाठी कोणी तुमच्यावर दबाव आणत असेल तर तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा. कोणाच्याही सल्ल्यानुसार कोणतेही मोबाइल ॲप डाउनलोड करू नका किंवा कोणतीही लिंक उघडू नका, तुमच्यासोबत कोणतीही सायबर फसवणूक झाली असेल तर तुम्ही 1930 वर कॉल करू शकता. तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधू शकता किंवा https://cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.
सायबर फसवणूक पद्धती: यामध्ये पीडितेला काही पैसे खात्यात गुंतवायला लावले जातात आणि नंतर त्याला वेगळे टास्क दिले जाते. ते पूर्ण केल्यावर फसवणूक करणारा दुसरा लालच दाखवून सापळा टाकतो. पैसे डबल करून देण्याची लालच दाखवली जाती.
ऑनलाइन नोकरी फसवणूक: तुम्हाला एका विशिष्ट कंपनीत लाखो रुपयांची नोकरी मिळत आहे. मात्र यामध्ये कागदपत्रे, मेडिकल, पोलिस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. पण पीडितेला कधीच नोकरी मिळत नाही.