मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २० जणांची दुसरी उमेदवारी यादी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केली. यामध्ये १६ नवीन चेहरे काँग्रेसने दिले आहेत. तर पंढरपूरमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले भारत भालके यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश करून तिथून उमेदवारी मिळाली असताना काँग्रेसने भालके यांच्याविरोधात शिवाजीराव काळुंगे हा आपला उमेदवार दिला आहे. यामुळे पंढरपुरात आघाडीच्याच दोन्ही उमेदवारात लढत होणार आहे.
हेही वाचा - 'मी शेतकरी' अभियानास सुरुवात, राज्यभरातील गावांमध्ये करणार ठिय्या
काँग्रेसमधून भाजप आणि सेनेच्या वाटेवर असलेल्या आपल्या २ विद्यमान आमदारांना तिकीट देऊन त्यांची मनधरणी केली असल्याचेही या उमेदवारी यादीतून स्पष्ट झाले आहे. त्यात मालाड येथून विद्यमान आमदार असलम शेख आणि अक्कलकोट येथील विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा समावेश आहे. कलिना या विधानसभा मतदार संघातील काँग्रेसने भाजपच्या वाटेवर असलेले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री असलेल्या कृपाशंकर सिंग यांचा पत्ता कट केला आहे. तर, त्यांच्या ठिकाणी जॉर्ज अब्राहम हा नवीन उमेदवार काँग्रेसने दिला आहे.
हेही वाचा - काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 34 नवे चेहरे; तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
दुसरीकडे वांद्रे पश्चिमेतून माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी आपल्या मुलाला तिकीट मिळावे म्हणून हट्ट धरला होता, परंतु काँग्रेसने अहमद झकेरिया यांना उमेदवारी दिली आहे. घाटकोपर पश्चिममधून मागील अनेक वेळा निवडणूक लढवणारे राम गोविंद यादव यांचाही काँग्रेसने पत्ता कट केला असून त्या ठिकाणी मनीषा सूर्यवंशी यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेससोडून भाजपमध्ये गेलेल्या सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काँग्रेसने प्रभाकर पालोदकर आणि मुंबईतील वडाळा येथून भाजपात गेलेल्या कालिदास कोळंबकर यांच्या विरोधात शिवकुमार लाड यांना उभे केले आहे. भायखळा ही जागा समाजवादी पार्टीला हवी होती, परंतु काँग्रेसने ती आपल्याकडे रोखून धरून त्या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण यांना पुन्हा रिंगणात उभे केले आहे. तर कोल्हापूर येथून सत्यजित कदम यांना बाजूला करून त्याठिकाणी चंद्रकांत जाधव यांना रिंगणात उतरवले आहे. तर, अलिबाग येथून श्रद्धा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे कुटुंब उपस्थित राहणार
काँग्रेसने या दुसऱ्या उमेदवार यादीत केवळ दोन जणांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यामध्ये नाशिकमधून शाहू खैरे आणि भायखळा येथून मधुकर चव्हाण यांचा समावेश आहे. हे दोन्ही उमेदवार मागील निवडणुकीमध्ये केवळ काही हजाराच्या फरकाने पराभूत झाले होते.