मुंबई- दिल्ली ते मुंबई 'एक्सप्रेस हायवे'चे काम जोरात सुरू आहे. या मार्गावर येत्या 3 वर्षांत पर्पलची अत्याधुनिक बस सेवा सुरू करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. भारतातील मुंबई-पुणे दरम्यान पहिल्या 'इलेक्ट्रिक इंटरसिटी बस'चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
मुंबई-पुणे पहिल्या 'इलेक्ट्रिक इंटरसिटी बस'चे उद्घाटन; दिवसातून दोन फेऱ्या - मुंबई ते पुणे बस
भारतातील मुंबई-पुणे दरम्यान पहिल्या 'इलेक्ट्रिक इंटरसिटी बस'चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही बस दोन तास पूर्णपणे चार्ज केल्यावर 300 किमी धावू शकते.
![मुंबई-पुणे पहिल्या 'इलेक्ट्रिक इंटरसिटी बस'चे उद्घाटन; दिवसातून दोन फेऱ्या inauguration-of-first-electric-intercity-bus-from-mumbai-to-pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6076369-thumbnail-3x2-mum.jpg)
येत्या दिवाळीत दिल्ली ते जयपूर या एक्सप्रेस हायवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
1300 पेक्षा अधिक वाहने चालवणाऱ्या प्रसन्न मोबिलिटी सोल्यूशन्स प्रा.लि.ने मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर भारताच्या पहिल्या इंटरसिटी इलेक्ट्रिक सूपर लक्झरी बस सेवेचे उद्घाटन केले आहे. ही बस 12 मीटर लांब असून त्यात 2 बाय 2 चे लक्झरी कोच आहेत. ती दिवसातून दोन वेळा मुंबई ते पुण्यादरम्यान धावणार आहे. ही बस दोन तास पूर्णपणे चार्ज केल्यावर 300 किमी धावू शकते. या बसचा सर्वोच्च वेग ताशी 100 किमीपर्यंत जाऊ शकतो. या बसमध्ये 43 सीट्सची क्षमता असून त्यात अद्ययावत मनोरंजन सुविधा, भरपूर सामानाची जागा, आरामदायी पुश बॅक सीट्स, अंतर्गत यूएसबी चार्जर्स आहेत. त्यामुळे व्यावसायिक, वैयक्तिक ट्रिप्स किंवा सहलीसाठी त्या उत्तम ठरणार आहेत.
मुंबई ते पुण्याचा प्रवास सुमारे 150 किमीचा असून त्यावर एमएसआरटीसीसह अनेक ऑपरेटर्स गाड्या चालवतात. रोजच्या सुमारे 200 बसेस या मार्गावर चालतात. हा अत्यंत लोकप्रिय मार्ग असून प्रवाशांची संख्या आणि बसेसची संख्या भविष्यात वाढेल. त्यामुळे 'कार्बन डायऑक्साइड'चे उत्सर्जनही खूप वाढू शकते. त्यामुळे ऑइलवरील बसचे प्रमाण कमी करण्यासाठी ऊर्जेच्या नुतनक्षम आणि स्वच्छ स्त्रोतांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विद्युत बसेसमुळे वायू प्रदूषणात घट होते. त्यामुळे पर्पल इलेक्ट्रिक इंटरसिटीचे उद्घाटन हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.