महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या लोकार्पण; वडाळा ते सातरस्ता मार्गावर धावणार मोनो

वडाळा ते सातरस्ता हा टप्पा सुरू झाल्यानंतर संपूर्ण मार्गिकेवर १ लाख प्रवासी संख्या अपेक्षित आहे. सेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येकी २२ मिनीटांच्या कालावधीने प्रवाशांना गाडी उपलब्ध होईल.

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या लोकार्पण

By

Published : Mar 2, 2019, 10:20 PM IST

मुंबई - गेले २ वर्ष रखडलेला वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण कार्यक्रम रविवारी (३ मार्च) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) नियोजित करण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्यात मोनो रेल्वे प्रकल्पामधून मलेशियन कंपनी स्कोमीला हद्दपार केल्यानंतर प्रकल्पाला आर्थिक उभारी देण्याबरोबरच १९ किमीच्या संपूर्ण मार्गाची सेवा सुरू करण्याचे प्रयत्न एमएमआरडीए करत आहे. वडाळ्यातील मोनो कार डेपोचा विकास, मोनोची स्थानके आणि खाबांवर जाहिराती अशा विविध उपाययोजना राबवून प्रकल्पाची आर्थिक स्थिती सुधारण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या सुरूवातीस नादुरुस्त मोनो गाड्यांचे यांत्रिक भाग प्रशासनाच्या ताब्यात आले होते. त्यांची जुळवाजुळव करुन दुरुस्त केलेली एक गाडी सध्या पहिल्या टप्यावर चालविण्यात येत असून अन्य दोन गाड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

वडाळा ते सातरस्ता हा टप्पा सुरू झाल्यानंतर संपूर्ण मार्गिकेवर १ लाख प्रवासी संख्या अपेक्षित आहे. सेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येकी २२ मिनीटांच्या कालावधीने प्रवाशांना गाडी उपलब्ध होईल. ४ डब्यांच्या गाडीत एकूण ५६७ प्रवासी प्रवास करु शकतील. या दुसऱ्या टप्प्यामुळे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार पडेल. काही महिने एकूण ६ गाड्यांच्या बळावर संपूर्ण १९ किमीच्या मार्गिकेवरील वाहतूक सुरू राहील. त्यानंतर टप्याटप्याने यामध्ये अतिरिक्त मोनो गाड्यांची भर पडेल.

वडाळा ते सातरस्ता ही सुमारे ११.२८ किमीची मार्गिका वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. या मार्गिकेदरम्यान केईएम, टाटा, कस्तुरबा गांधी अशी महत्वाची रुग्णालये आहेत. तसेच वडाळा, करी रोड, लोअर परळ या रेल्वे स्थानकांना हा टप्पा जोडतो. शिवाय अनेक नामांकित शिक्षण संस्था देखील या मार्गिकेच्या जवळपास आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details