मुंबई - मालाड मालवणी येथील अंबुजवाडी परिसरातील एका शाळेने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ केली आहे. मालवणीत राहणारे फैय्याज शेख व मिजगा शेख हे दाम्पत्य झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी गेले 10 वर्षे झील स्कूल चालवतात. या शाळेचे विश्वस्त असलेले फैय्याज शेख हे नामांकित परफ्यूम तयार करणाऱ्या एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत, तर त्यांची पत्नी मिजगा शेख या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. या शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी हे झोपडपट्टी परिसरात राहणारे आहेत.
शाळेकडून विद्यार्थ्यांची फी माफ; शेख दाम्पत्याचा पुढाकार
अनेक पालक फी भरता येणार नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून काढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता आम्ही पालकांना समजवण्याचा प्रयत्न करत असून या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भावना निर्माण करत असल्याचे शाळेचे विश्वस्त फैय्याज शेख यांनी सांगितले.
बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांचे हातावर काम असल्याने अनेकांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. शाळेने गेल्या 4 महिन्यांच्या या लॉकडाऊनमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरी अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. एका टप्प्यावर जमा झालेले पैसेही संपल्यावर या शाळेच्या मुख्याध्यापिकेने घर घेण्यासाठी पतीच्या पीएफ खात्यामधून काढलेल्या पैसे वापरुनदेखील अन्नधान्य वाटप केले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची दरमहा फी 200 रुपये आहे.
'ज्या झोपडपट्टीतील घरात खाण्यासाठी पैसे नाहीत ते शाळेची फी कशी भरणार याची जाणीव आम्हाला आहे. अनेक पालक फी भरता येणार नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून काढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता आम्ही पालकांना समजवण्याचा प्रयत्न करत असून या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भावना निर्माण करत असल्याचे शाळेचे विश्वस्त फैय्याज शेख यांनी सांगितले.