मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणातील एकमात्र साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणा (एनआयए) करीत आहे. आता एनआयएच्या हाती मोठी माहिती लागली आहे. मनसुख व सचिन वाझे यांच्यामध्ये 17 फेब्रुवारी रोजी 9 मिनिटांची भेट झाली होती. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. तर, वाझेला हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली होती, असेही समोर आले आहे.
हिरेन यांनी दिली वाझेला स्कॉर्पिओ गाडी -
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, सचिन वाझेला हिरेन मनसुख यांनी विक्रोळी हायवेवर सोडलेल्या स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली होती. या नंतर सचिन वाझेने हिरेनला दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन वाहन चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. या नंतर विक्रोळी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वाहन चोरीचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप एनआयएने केला आहे. या संदर्भात विक्रोळी पोलीस ठाण्याच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. या बरोबरच मुंबई पोलीस खात्यातून अंतर्गत चौकशी सुद्धा सुरू असल्याचे समोर आले आहे.