मुंबई - वाहने कंपनीसाठी भाड्याने द्या, असे सांगून लोकांना जास्त पैशांचे अमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचा मालक मनीष शेठी कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाला होता. पण पोलिसांनी केलेल्या कोंडीमुळे तो विक्रोळी न्यायालयात मंगळवारी हजर झाला. शेठीला विक्रोळी न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनीष शेठी कोट्यवधींचा गंडा घालून झाला होता पसार मनिष शेठी आणि त्याच्या टोळीने आतापर्यंत सुमारे 250 पेक्षा जास्त जणांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेठी हा वाहनांसाठी डाऊन पेमेंट घेत होता. काही महिने आर्थिक उत्त्पन्न देत होता. हळूहळू त्याने पैसे देणे बंद केले आणि पळ काढला. पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीमुळे तो स्वतःहून विक्रोळी न्यायलायत हजर झाला. ही माहिती पसरताच न्यायालय परिसरात गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शेठीला विक्रोळी न्यायालयात नेताना त्यांनी चोर,चोर अशा घोषणा दिल्या.
साईनर्जी कॅब या कंपनीचे कार्यालय कन्नमवार नगर येथील आदित्य टॉवर नामक इमारतीत असून संचालक मनीष सेठी तेथून कारभार चालवत होता. चारचाकी घेण्याच्या नावाखाली डाऊन पेमेंट म्हणून त्याने काही जणांकडून 2 लाख 20 हजार, काहींकडून 50 हजार तर काहींकडून 90 हजार रुपये घेतले होते. त्यांच्यासोबत 5 वर्षांचा करार करून त्यांना दरमहा भाडे मिळणार, गाडीचा हफ्ता ही कंपनी भरणार आणि 5 वर्षानंतर गाडीही परत दिली जाणार, असे अमिषने दाखविले होते. आता वाहनाचा हफ्ता भरण्याची वेळ लोकांवर आली आहे. महिलांनी दागिने गहाण ठेवून पैसे भरले आहेत.
अनेकांना काही महिने भाडेही मिळत होते. मात्र, काही काळानंतर भाडे मिळणे बंद झाले. डाउनपेमेंट करूनसुद्धा अनेकांना गाड्या ही मिळालेल्या नाहीत आणि कंपनीचा संचालक पसार झाला आहे. शेठीने कंपनीचे कार्यालयही बंद केले आहे. पैसे किंवा गाडी मिळावी यासाठी पीडित पोलीस ठाण्याचा चकरा मारत आहेत. आता शेठीने नेमके किती जणांना फसवले. किती कोटींचा हा घोटाळा आहे, याचा विक्रोळी पोलीस तपास करत आहेत.