मुंबई- एक जूननंतर राज्यात निर्बंधांमध्ये कायम राहण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्यातील निर्बंधाचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. आज (दि. 27 मे) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा झाली असून, राज्यात निर्बंधांचा कालावधी वाढण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र, 1 जूननंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी 10 ते 15 जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतो असून, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांक पातळीवर पोहोचली होती. आजची राज्यातील रुग्ण संख्या कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. त्यामुळे एकदम निर्बंध न उठवता ते 1 जूननंतर वाढवून टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यात आता 3 लाख 15 हजार एवढी रुग्ण संख्या आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीनंतर राज्यातील रुग्णांची आकडेवारी ही 8 लाखापर्यंत गेली होती. मात्र आता 3 लाखापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निर्बंध उठवणे शक्य नसून, ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या कमी होत आहे. तिथे निर्बंध शिथील करण्याबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लसीकरणासाठी दुसऱ्या डोसला प्राधान्य
सध्या राज्यामध्ये लसींची तुटवडा आहे. त्यामुळे राज्य सरकार केवळ 45 वर्षे वयोगटावरील लोकांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य देत आहे. लसीकरणाबाबत ग्लोबल टेंडर काढले असले तरी अद्याप प्रतिसाद नाही. तसेच विदेशी कंपन्यांची लसींची किंमत सातशे ते अठराशे रुपयांपर्यंत आहेत. या किंमती प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे देशात राज्याराज्यांमध्ये लसींची वेगवेगळी किंमत असण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून केंद्राने ग्लोबल टेंडर काढावे. त्यानंतर राज्यामध्ये केंद्र सरकारने लस पुरवाव्यात जेणेकरून लसींची किंमत एकच राहील, अशी मागणी देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली.