मुंबई Mumbai Crime : गुन्हे शाखेनं शनिवारी (9 डिसेंबर) बांगलादेशी नागरिक अबुशाहीद अब्दुल हमीद आलमिया (वय 26) याला नवी मुंबई येथून अटक केली. काही वर्षांपूर्वी आलमियाचे आई-वडील बेकायदेशीरपणे भारतात आले होते. तसंच त्याचा जन्मही मुंबईतच झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, काही वर्षांसाठी आलमिया पुन्हा बांगलादेशात गेला होता. मात्र, तेथे पाचवीपर्यंतचं शिक्षण घेऊन तो बेकायदेशीरपणे भारतात परतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीच्या वकिलाचं काय आहे म्हणणं :आलमियाला रविवारी (10 डिसेंबर) न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. आलमियाचे वकील अटल बिहारी दुबे यांनी न्यायालयाला सांगितलं की, त्याचा जन्म भारतात झालाय. त्यामुळं त्याला बांगलादेशी नागरिक म्हणता येणार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं सांगितलं की, त्याचे आई-वडील बेकायदेशीरपणे भारतात आले होते. तसंच बांगलादेशमध्ये राहणारा शरीफ उल नामक व्यक्तीच्या सांगण्यावरुन आलमिया येथे राहत असलेल्या बांगलादेशी लोकांकडून पैसे घेत असे. दरम्यान, शरीफ उल कोण आहे? यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दोघांना अटक :गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे शाखा कारवाई करत आहे. युनिट 6 ने शिवडी रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून पहिला आरोपी अक्रम नूरनबी शेख (वय 26) याला अटक केली. त्यानंतर तपासात उघड झालं की, शेख हा मूळचा बांगलादेशी नागरिक असून त्यानं भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली होती. त्यानंतर पोलिसांनी 26 वर्षीय लीना शाजन हलदर या बेकायदेशीर स्थलांतरित महिलेला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून अटक केली. या प्रकरणी दोघांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.