मुंबई - मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईतील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. याचा अर्थ या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याची त्यांना माहितीच नव्हती, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मुंबईमध्ये सार्स-कोविड २ संदर्भात रक्त नमुन्यांमध्ये असलेल्या अँटीबॉडीजचे सर्वेक्षण म्हणजेच सेरोलॉजिकल सर्वेलन्स नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्याकडून करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान, ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हेदेखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी होते.
या विभागात केले सर्वेक्षण - सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फेऱ्यांमधून सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर उत्तर, एम पश्चिम आणि एफ उत्तर या ३ विभागांमध्ये हे नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली.
सर्वेक्षण अहवाल आकडेवारी - पहिल्या फेरीमध्ये जुलै २०२० या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात अंदाजित केलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले. त्यात झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के याप्रमाणे अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे.
काय म्हणतो अहवाल -
- अँटीबॉडीज प्राबल्य महिलांमध्ये किंचितसे अधिक
- तीनही विभागांमध्ये रुग्ण मृत्यू दर सुमारे ५-६ टक्के आहे, याच्या तुलनेत संसर्ग मृत्यू दर हा अतिशय कमी (०.०५ ते ०.१०%) असण्याची शक्यता
- सिमटोमॅटिक रुग्णांना विलगीकरण व इतर उपाययोजना यामुळे प्रसार रोखणे शक्य
- संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मास्क वापरणे इत्यादी उपाययोजना नित्याच्या बाबी म्हणून स्विकारल्या गेल्या पाहिजेत.