मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडाचा फटका भाजप, शिंदे गटाला बसेल अशी भीती व्यक्त करणारे पत्र भाजपच्या गोटातून केंद्राला पाठवले आहे. लोकसभा, राज्यसभा निवडणुका एप्रिल मे 2024 दरम्यान होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकादेखील याच दरम्यान होण्याची शक्यता आहे. लोकसभेला 48 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरेकडून जागा वाटपाची रणनीती आखली जात आहे.
वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून जागा :मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या चार, भाजपच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. निवडून आलेल्या चार जागा ठाकरेंना देण्यात येण्याची शक्यता आहे. उर्वरित दोन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा दिली जाईल. उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील वर्चस्व, अनेक भागातील बालेकिल्ल्यामुळे शिवसेनेला झुकते माफ देण्यात येणार असल्याचे समजते. विधानसभेच्या 288 जागांसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वाधिक जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीत नव्याने सामील झालेल्या वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून जागा देण्यात येणार असल्याचे समजते.