मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे बुधवारी नव्याने 15 रुग्ण आढळून आले आहेत. तर आज (गुरुवारी) दोन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 124 वर पोहचली आहे. बुधवारी नव्याने आढळलेल्या 15 रुग्णांपैकी 5 रुग्ण हे सांगली येथील असून इतर 10 रुग्ण हे मुंबई व मुंबई परिसरातील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या विभागातील आहेत. तर आज आढळलेले नवे रुग्ण मुंबई आणि ठाण्यातील आहेत. तर 24 मार्चला मृत्यू झालेल्या वाशीतील महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नवी मुंबईतील वाशी खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा आता चार वर गेला आहे.
हेही वाचा-'कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला, यास पुरावा नाही' - चीनी दुतावास
राज्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल (बुधवारी) कोरोनाच्या आणखी 15 रुग्णांची नोंद झाली. तर आज त्यात दोन रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 124 झाली आहे. बुधवारी सापडलेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 7, सांगलीमधील इस्लामपूरचे 5 तर कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहेत. या नवीन बाधित रुग्णांपैकी सांगलीचे 5 रुग्ण हे मंगळवारी बाधित आढळलेल्या 4 रुग्णांचे निकट सहवासित आहेत.
नवी मुंबईतील 57 वर्षीय पुरुष हा यापूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या फिलिपाईन नागरिकाच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कामोठे–पनवेल इथे आढळलेला 38 वर्षाचा पुरुष हा त्रिनिदाद येथे गेला होता. तर मुंबईतील अनुक्रमे 27 व 39 वर्षाचे दोन पुरुष रुग्ण हे अमेरिका आणि युएई या देशांमध्ये प्रवास करुन आले आहेत. तर इतर 5 रुग्ण हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत. कल्याण डोंबवली परिसरातील 26 वर्षाच्या तरुणाने तुर्कस्थानचा प्रवास केलेला आहे. तर आज, आज आढळलेल्या नविन रुग्णांची हिस्ट्री अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर 21 दिवसांचे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे.