मुंबई -म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळेधारकांनी कोट्यवधीचे भाडे थकवले आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी मंडळाने अभय योजना आणली. या योजनेला पहिल्या महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, अशा केवळ 20 दिवसांत 3 कोटी 84 लाखांची वसुली करण्यात मंडळाला यश आले आहे. वर्षभरात जिथे 2 कोटी वसूल होत होते, तिथे अवघ्या 20 दिवसांत 3 कोटी 84 लाख रुपयांची वसुली होणे ही समाधानकारक बाब मानली जात आहे.
माहिती देताना मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर हेही वाचा -उपमुख्यमंत्री अजित पवारांची वीज तोडणीला स्थगिती; दोन दिवसात विजेच्या प्रश्नावर तोडगा काढणार
दरम्यान, आता अभय योजना आणखी महिनाभर सुरू असणार असून आता व्याजावर 40 टक्के सूटसह योजनेचा लाभ घेता येणार आहे. तेव्हा मार्चमध्ये अधिकाधिक गाळेधारकांनी या योजनेचा लाभ घेत थकीत रक्कम भरावी, असे आवाहन दुरुस्ती मंडळाने केले आहे.
21 हजार 149 गाळेधारकांकडे 129 कोटींची थकबाकी
उपकरप्राप्त धोकादायक-अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतरित केले जाते. या पात्र रहिवाशांकडून 500 रुपये दर महिना भाडे घेतले जाते. तर, दुसरीकडे या सर्वच शिबिरात घुसखोरी झाली असून घुसखोरांकडून 3 हजार रुपये, असे महिन्याला भाडे घेतले जाते. पण, प्रत्यक्षात अनेक जण हे भाडे भरत नसल्याचे चित्र आहे. भाडे न भरल्यास त्यांना व्याजही लावले जात आहे. मात्र, तरीही अनेक जण भाडे भरत नसल्याचे दिसते. त्यातूनच 21 हजार 149 गाळेधारकांकडे भाडे आणि व्याज मिळून 129 कोटींची थकबाकी आहे. हा आकडा खूप मोठा आहे. त्यामुळेच ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी दुरुस्ती मंडळाने 8 फेब्रुवारीपासून अभय योजना सुरू केली.
योजनेनुसार 8 ते 28 फेब्रुवारी दरम्यान थकबाकी भरणाऱ्याला व्याजावर 60 टक्के, तर 1 ते 31 मार्चपर्यंत थकबाकी भरणाऱ्याला व्याजावर 40 टक्के सूट देण्यात आली आहे. त्यानुसार 20 दिवसांत मंडळाने 3 कोटी 84 लाख वसूल केल्याची माहिती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.
गोराईतून सर्वाधिक 2 कोटी 5 लाखांची वसुली
8 फेब्रुवारीपासून अभय योजनेला सुरुवात झाली असून याद्वारे 20 दिवसांत 3 कोटी 84 लाख वसूल झाले आहेत. जेव्हा की 2020 मध्ये संपूर्ण वर्षात अंदाजे 2 कोटी वसूल झाले होते. दरम्यान, घोसाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक वसुली ही गोराई रोड येथे झाली आहे. येथून 2 कोटी 5 लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर, सर्वात कमी वसुली निर्मल नगर येथून झाली असून, ही रक्कम अवघी 51 हजार इतकी असल्याचे सांगितले जात आहे. महत्वाचे म्हणजे वांद्रे पश्चिम येथील एकाही गाळेधारकाने एक रुपयाचीही थकबाकी भरलेली नाही.
वांद्रे पश्चिममध्ये लोकप्रतिनिधीकडूनच अडवणूक?
अभय योजनेद्वारे थकबाकी भरण्याची ही सुवर्णसंधी आहे. अन्यथा ही रक्कम वाढत राहिली तर पुढे म्हाडाच्या कारवाईला सामोर जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन म्हाडाकडून केले जात आहे. मात्र, त्याचवेळी वांद्रे पश्चिम येथील लोकप्रतिनिधीच थकबाकी भरू नका, असे आवाहन गाळेधारकांना करत आहे. त्यामुळे, येथून एकही रुपया वसूल न झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याला घोसाळकर यांनी दुजोरा दिला आहे. तर, याची दखल घेत आता लोकप्रतिनिधींशी आणि रहिवाशांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या योजनेला लोकांची मागणी असल्यास योजनेला आणखी मुदतवाढ देऊ, असेही घोसाळकर यांनी सांगितले.
हेही वाचा -'12 सदस्य राज्यपालांनी मांडीखाली दाबून ठेवले आहेत, ते मोकळे करावे'