महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरी विकासासोबत लोकांचा मानसिक विकासही आवश्यक ; आदित्य ठाकरे - mumbai aditya news

इंस्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये ६८ व्या राष्ट्रीय नगर आणि क्षेत्रे नियोजनकार परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शहराच्या नियोजनामध्ये घनकचरा व्यवस्थापन, वाहतुकीचे नियोजन आणि अर्बन फॉरेस्ट या संकल्पना महत्त्वाच्या आहेत.

In addition to urban development, mental development of people is also essential; Aditya Thackeray
शहरी विकासासोबत लोकांचा मानसिक विकासही आवश्यक ; आदित्य ठाकरे

By

Published : Jan 13, 2020, 3:55 AM IST

मुंबई- नगर रचना विभागामार्फत करण्यात येत असलेले शहराचे नियोजन फक्त निवासी आणि वाणिज्य भुखंडांचे आरक्षण आणि उद्योगांच्या बदलण्यात येणाऱ्या जागा एवढ्यापुरते मर्यादीत न ठेवता, शहरातील नागरिकांना मनशांती कशी मिळेल याचाही विचार करावा. शहरीकरण करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, नागरिकांना मनमोकळेपणाने वावरता यावे याची काळजी घ्यावी, असा सल्ला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नियोजनकारांना दिला.

इंस्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये ६८ व्या राष्ट्रीय नगर आणि क्षेत्रे नियोजनकार परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शहराच्या नियोजनामध्ये घनकचरा व्यवस्थापन, वाहतुकीचे नियोजन आणि अर्बन फॉरेस्ट या संकल्पना महत्त्वाच्या आहेत.

२०१७ मध्ये मुंबई शहरात दररोज दहा हजार टन कचरा जमा होत होता. २०२० मध्ये तो १४ हजार टनापर्यंत जाणे अपेक्षीत होते. मात्र कचऱ्याचे योग्य पध्दतीने नियोजन झाल्यामुळे सध्या शहरात फक्त सहा हजार ८०० टन कचरा दररोज जमा होत आहे. शहरात ६६ पडिक असलेल्या भुखंडावर येत्या तीन महिन्यात चार लाख झाडे लावण्यात येणार आहेत. जपानी तंत्रज्ञानाच्या आधारे या ठिकाणी घनदाट शहरी जंगल तयार केले जाणार आहे, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. यावेळी इंस्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर इंडियाचे अध्यक्ष डी. एस. मेश्राम, उपाध्यक्ष मिलिंद पाटील, प्रदीप कपूर आणि एआरसी मुंबईचे अध्यक्ष जितेंद्र भोपळे उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, १४ वर्षांपुर्वी मी 'डे आफ्टर टुमारो' हा चित्रपट पाहिला होता. पुढील १०० वर्षांनंतर काय होणार हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. मात्र ती भयानकता आताच दिसू लागली आहे. ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेल्या आगीत कोट्यवधी प्राणी मृत्युमुखी पडले, आखातामध्ये युध्दजन्य परस्थिती निर्माण झाली आहे, जगभरात समुद्र किनारी वसलेल्या शहरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे डे आफ्टर टुमारो ऐवजी 'डे आफ्टर टूडे' म्हणण्याची वेळ आली आहे. शहरांचा विकास होतो, तेव्हा रोजगाराच्या संधी निर्माण होतात. मात्र, या संकल्पनेबरोबरच 'ईज ऑफ लिव्हिंग'ची संकल्पना वाढणे आवश्यक असून ते वाढविण्यासाठी नियोजन विभागाने प्रयत्न करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - 'सरकार कोणाचंही असो त्याच्याकडे पैसे नसतात, पण माझ्या खिशात ४ लाख कोटी रुपये आहेत'

ABOUT THE AUTHOR

...view details